झेडपीच्या ३ हजार ३० मालमत्तांची ऑनलाईन नोंद
esakal October 27, 2025 12:45 AM

जिल्हा परिषदेच्या तीन हजार ३० मालमत्तांची ऑनलाइन नोंद
सर्वाधिक ग्रामपंचायत विभागाच्या दोन हजार ९२५ मालमत्तांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : ठाणे जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शक व गतिमान होण्यासाठी हायटेक टेक्नोलॉजीचा वापर करण्यात येत आहे. अशातच जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मालमत्तांचा शोध घेऊन त्यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी ऑनलाइन प्रणाली तयार करण्यात आली. त्यानुसार नऊ हजार ४४७ मालमत्तांचा शोध घेतला असून, त्यापैकी तीन हजार ३० मालमत्तांच्या ऑनलाइन नोंदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायत विभागाच्या दोन हजार ९५२ मालमत्तांची नोंद आहे.
जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शहर व तालुक्यांच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जागा, मालमत्ता आहेत. या जागांवर अथवा मालमत्तांवर अनेक ठिकणी अतिक्रमणामुळे आणि संबंधित मालमत्तांची कागदपत्रेच सापडत नसल्यामुळे प्रशासनाची अडचण होत असते. या जागांवर अतिक्रमण झाल्यामुळे त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या महसुलावर होत आहे. याची दखल घेत, तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आधुनिकतेची कास धरत, मालमत्तांचे सर्वेक्षण करून त्यांची ऑनलाइन नोंद प्रणाली तयार केली.
तसेच ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या असलेल्या व माहीत नसलेल्या नऊ हजार ४४७ मालमत्तांचा शोध घेण्यात आला. ही डिजिटल प्रणाली केवळ मालमत्ता नोंदीसाठीच नव्हे, तर मालमत्तेचे संरक्षण, नियोजन, सुविधा उपलब्धता, देखभाल आणि उत्पन्न वाढ यासाठीसुद्धा प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास रोहन घुगे यांनी व्यक्त केला होता.

भिवंडी तालुक्यातील सर्वाधिक ९२० मालमत्तांच्या नोंदी
ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मालमत्तांचा शोध घेऊन त्यांचे ऑनलाइन प्रणालीद्वारे नोंदणी करण्यात येत आहे. पाच तालुक्यांपैकी भिवंडी तालुक्यात सर्वाधिक ९२० मालमत्तांच्या नोंदी झाल्या असून, त्याखालोखाल शहापूरमधील ८१२, मुरबाड तालुक्यातील ६५८, अंबरनाथ तालुक्यातील ३२९ तर, कल्याण तालुक्यातील ३११ मालमत्तांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.