ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशानं राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. सरकारची ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे. मात्र सध्या ही योजना चांगलीच चर्चेमध्ये आहे. त्यामागे अनेक कराणं आहेत.
ही योजना सुरू करताना सरकारने काही अटी आणि नियम घातले होते. मात्र पात्र नसताना देखील अनेक महिलांनी आता या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत अशा महिलांची नावं या योजनेतून वगळण्यात येत आहेत. काही ठिकाणी तर सरकारी नोकरीमध्ये असताना देखील महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार समोर आला आहे, त्यामुळे सरकारकडून आता अशा प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेली असून, या महिलांची नावं वगळण्यात येत आहेत.
मात्र दुसरीकडे विरोधकांकडून लवकरच ही योजना बंद होणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे, लाडकी बहीण योजनेतून काही महिलांची नाव वगळी जात आहेत, त्यावर देखील विरोधकांकडून प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. ही योजना फक्त निवडणुकीपूरतीच होती अशी टीका विरोधकांकडून सुरू आहे, यावर आता पुन्हा एकदा फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना मोठं वक्तव्य केलं आहे.
आम्ही सुरु केलेल्या योजना कधीच बंद होऊ देणार नाही. जोपर्यत देवभाऊ, शिंदे साहेब आणि अजितदादा आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच 2026 नंतर शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा 12 तास वीज देणार, पाच वर्ष मोफत वीज देणार असं देखील यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते सातारा जिल्ह्यातील फलटण येथे बोलत होते. दरम्यान अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यासाठी आता सरकारकडून योजनेच्या केवायसीला सुरुवात झाली आहे.