बिडकीन (ता. पैठण) : येथे वाढदिवस व दिवाळी शुभेच्छांच्या बॅनरवरील वादातून अल्पवयीन मुलाचा खून झाला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी (ता. २५) न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बिडकीन येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ऋतिक धर्मे या युवकाने दिवाळी शुभेच्छांचा बॅनर लावला होता. त्याच ठिकाणी ऋषीकेश ऊर्फ चिमन जाधव आणि त्याच्या साथीदारांनी वाढदिवसाचा बॅनर लावल्याने वाद निर्माण झाला.
या प्रकरणावरून बजरंग ठाणगे आणि ऋषीकेश यांच्यात फोनवर वाद झाला होता. दरम्यान, गुरुवारी (ता. २३) रात्री साडेनऊ ते अकरा दरम्यान गोरक्षनगर परिसरात ऋषीकेश ऊर्फ चिमन जाधव, संतोष ठाणगे, राहुल ठाणगे, सागर ठाणगे, प्रदीप ठाणगे आणि त्यांच्या साथीदारांनी लोखंडी पाइप, गज व लाकडी दांड्यांनी हल्ला केला.
या हल्ल्यात तन्मय गणेश चोरमारे (वय १७, रा. बिडकीन) व ऋतिक धर्मे यांना बेदम मारहाण करण्यात आली. यात गंभीर जखमी झालेल्या तन्मयचा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Crime News : नाशिक पंचवटी थरार: भरदिवसा धारदार शस्त्राने हल्ला; सीसीटीव्ही फुटेजमुळे दोन संशयित ताब्यात!यानंतर तन्मयचा मामा योगेश दाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा नोंद झाला. यावरून ऋषीकेश जाधव, राहुल ठाणगे, सागर ठाणगे, प्रदीप ठाणगे या चौघांना पोलिसांनी अटक केली. संतोष ठाणगे हा सध्या संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. संशयित आरोपींना शनिवारी न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.