पिंपरी, ता. २६ ः शहरात रविवारी (ता. २६) दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहराला झोडपून काढले. मुसळधार पाऊस, वारे यामुळे बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाचा जोर एवढा होता की अवघ्या काही मिनिटांतच शहरातील रस्ते जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
गुरुवारपासून (ता.२३) शहरात पाऊस शहरात हजेरी लावत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांत केवळ पावसाचा शिडकावा होत होता. मात्र, रविवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने अवघ्या काहीच मिनिटांमध्ये शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. सखल भागात पाणी साचले होते. तर काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते. शहरातील निगडी, पिंपरी, चिंचवड,मोशी, भोसरी, कासारवाडी, दापोडी यांच्यासह उपनगरांमध्येही पावसाने हजेरी लावली.
रविवारची सुटी असल्याने बहुतांश नागरिक घरीच होते. मात्र, कामानिमित्त बाहेर पडलेले व दिवाळीच्या सुट्या आटोपून शहरात परतणारे नागरिक व विद्यार्थी यांना या पावसाचा फटका बसला. पावसापासून बचावासाठी नागरिक ग्रेड सेपरेटर, दुकाने, उड्डाणपूल यांचा आडोसा घेताना दिसून आले.