रणजी ट्रॉफी 2025-26 सीजनच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई टीम छत्तीसगड विरुद्ध आपला सामना खेळत आहे. या मॅचमध्ये मुंबई टीमने प्रथम फलंदाजी केली. मुंबई टीम स्कोर बोर्डवर मोठी धावसंख्या लावण्यात यशस्वी ठरली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मुंबई टीमने 8 विकेट गमावून 406 धावा केल्या होत्या. यात मोठं योगदान मुंबईचा दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणेच आहे. त्याने आपल्या करिअरमधील 42 वं फर्स्ट-क्लास शतक ठोकलं.
महत्वाच्या क्षणी अजिंक्य रहाणे मुंबईसाठी ही इनिंग खेळला. तो फलंदाजीला आला, तेव्हा मुंबई टीमने 38 धावांवर 3 विकेट गमावले होते. त्यानंतर रहाणेने डाव संभाळत खोऱ्याने धावा केल्या. अजिंक्य रहाणेने त्याच्या या इनिंगद्वारे टीम इंडियात पुनरागमनासाठी आपला दावा मजबूत केला आहे. रहाणेने त्याच्या इनिंगमध्ये 303 चेंडूंचा सामना करताना 159 धावा केल्या. त्याच्या इनिंगमध्ये 21 चौकार होते. तो क्रॅम्प्समुळे रिटायर्ड हर्ट सुद्धा झाला. पण त्यानंतर त्याने मैदानावर पुनरागमन करुन धावा सुद्धा जोडल्या.
वय फक्त एक नंबर
या दमदार इनिंगनंतर मीडियाशी बोलतानारहाणेने टीम इंडियातील त्याच्या पुनरागमनाबद्दल मोठं स्टेटमेंटही दिलं. “मला माहितीय, मी किती चांगला खेळाडू आहे. मी बाहेरची गडबड ऐकत नाही. मला व्यक्तीगतरित्या असं वाटतं की, भारताला ऑस्ट्रेलियात माझी आवश्यकता होती. अनुभवाचं सुद्धा एक महत्व आहे. वय फक्त एक नंबर आहे. मी रोहित आणि विराटसाठी खूप खुश आहे. त्यांच्या फलंदाजीवरुन अनुभवाचं महत्व लक्षात येतं. वय काय फक्त एक आकडा आहे” असं अजिंक्य रहाणे म्हणाला.
अजिंक्य टीम इंडियाकडून शेवटचा सामना कधी खेळलेला?
अजिंक्य रहाणेला टीम इंडियाकडून शेवटचा सामना खेळून दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तो जुलै 2023 मध्ये भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला. त्यानंतर सिलेक्टर्सनी त्याला संधी दिली नाही. मागच्या दोन वर्षात देशांतर्गत सीजनमध्येही तो फार चमकदार कामगिरी करु शकलेला नाही. मात्र, तरीही अजिंक्य रहाणेने हार मानली नाही. त्याला अजूनही पुनरागमनाची अपेक्षा आहे.