Maharashtra Rain : महाराष्ट्राला पुन्हा पावसानं झोडपलं, अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस
Tv9 Marathi October 27, 2025 12:45 PM

महाराष्ट्राला आधीच पावसानं झोडपलं आहे, राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला, शेतीचं प्रचंड नुकसान झालं. मात्र आता पाऊस गेला असं वाटत असतानाच पुन्हा एकदा पावसाचं जोरदार आगमन झालं आहे, गेल्या 24 तासांमध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे, या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. जाणून घेऊयात राज्यात कुठे-कुठे पाऊस झाला त्याबद्दल माहिती.

मुंबईत पावसाची हजेरी 

आज दिवसभर मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण होतं, त्यानंतर मुंबईच्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली, अचानक आलेल्या पावसामुळे नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पहायला मिळालं. मुंबई उपनगरातील, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि अंधेरी भागात काही वेळ जोरदार पाऊस झाला.

मीरा -भाईंदरमध्ये पाऊस 

दरम्यान दुसरीकडे आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा मीरा -भाईंदरमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. दुपारपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस  

जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला आहे. जळगाव शहरात आज दिवसभर ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळाला, मात्र सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक जोरदार पावसानं हजेरी लावली.  जळगाव तालुक्यासह अनेक भागात झालेल्या या पावसाचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

नंदूरबारमध्ये जोरदार पाऊस  

नंदूरबार जिल्ह्यात देखील आज जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.  नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला, या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. पावसाळा संपला असला तरीदेखील जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरूच आहे.  जिल्ह्यात सुरू  असलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.  एकीकडे  पिकांना भाव नाही  तर दुसरीकडे पावसामुळे पिकांचे नुकसान सुरू आहे, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस सुरू असल्यानं याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे. दरम्यान आणखी काही दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.