हॉली क्रॉस शाळेच्या मुलींची खो-खोमध्ये चमकदार कामगिरी
esakal October 27, 2025 12:45 PM

हॉली क्रॉस शाळेच्या मुलींची खो-खोमध्ये चमकदार कामगिरी
जिल्हास्तरीय स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात सुवर्णपदक

कल्याण, ता. २६ (वार्ताहर) ः नुकत्याच पार पडलेल्या आंतरशालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत कल्याणच्या हॉली क्रॉस शाळेच्या मुलींनी नेत्रदीपक कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. दोन्ही गटांत यश मिळवत त्यांनी क्रीडाजगतात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

हॉली क्रॉस शाळेच्या मुलींनी १७ वर्षांखालील गटात ऐतिहासिक कामगिरी केली. या गटात एकूण ३६ संघांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या आणि कडव्या लढतींमध्ये हॉली क्रॉसच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, शाळेसाठी या गटात तब्बल १७ वर्षांनंतर सुवर्णक्षण प्राप्त झाला आहे. या दमदार विजयामुळे हॉली क्रॉसच्या संघाला आता मुंबई विभागीय स्पर्धेसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे.

१४ वर्षांखालील गटातही हॉली क्रॉस शाळेच्या मुलींनी आपले वर्चस्व सिद्ध केले. या गटात १९ संघांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी हॉली क्रॉसच्या संघाने उत्कृष्ट खेळ सादर करत द्वितीय क्रमांक (उपविजेतेपद) पटकावले. मुलींच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका जेसिंगथा यांनी संघाचे विशेष अभिनंदन करून, त्यांच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. क्रीडा शिक्षक रवींद्र देसाई आणि खो-खो प्रशिक्षक भारत नाईकनवरे यांच्या प्रयत्नांमुळे आणि योग्य मार्गदर्शनाखालीच मुलींनी हे मोठे यश संपादन केल्याचे नमूद करण्यात आले. या यशाबद्दल सर्व स्तरांतून खेळाडूंचे आणि मार्गदर्शकांचे कौतुक होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.