Mumbai-Goa Highway by ‘Omkar’ Elephant : मागील काही दिवसांपासून बांदा, मडुरा आणि आसपासच्या गावांमध्ये हाहाकार माजवणारा ओंकार हत्ती शनिवारी सकाळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उतरला. इन्सुली डोबवाडी येथे हत्तीने थेट रस्त्यावर ठिय्या मारल्याने महामार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली. त्यानंतर हत्तीने इन्सुलीच्या भरवस्तीतील कुडवटेंब व सावंतटेंब परिसरात आश्रय घेतला.
शनिवारी सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास ओंकार महामार्गावर आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हत्ती काही काळ रस्त्यावर फिरत राहिला. वाहनांच्या हॉर्नकडे पूर्ण दुर्लक्ष करत तो शांतपणे रस्त्याच्या मधोमध उभा राहिला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रित केली.
वनविभागाचे अधिकारी आणि जलद कृती पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हत्तीला परत जंगलाकडे वळवण्यासाठी फटाके वाजविण्यात आले; मात्र हत्तीने महामार्ग ओलांडत इन्सुली गावात प्रवेश केला. गेल्या पंधरा दिवसांपासून ओंकार हत्तीने मडुरा, कास परिसरात थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून लोकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाने जेरबंद मोहीम राबवली असली तरी अद्याप ती यशस्वी ठरलेली नाही. स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाकडे अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. आमच्या रोजच्या जगण्यावर हा हत्ती संकट बनला आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, महामार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प राहिल्यानंतर हत्ती हळूहळू जंगलाच्या दिशेने वळल्याने परिस्थिती सामान्य झाली. मात्र, तो पुन्हा महामार्गावर परत येण्याच्या भीतीने स्थानिक नागरिक आणि वाहनचालक अजूनही धास्तावलेले आहेत.
आवाज ऐकताच सारे थबकले
थरारक अनुभवाबाबत इन्सुलीचे ग्रामस्थ गुरू पाटील म्हणाले, ‘‘आज सायंकाळी मी रस्त्यावरून जात असताना अचानक समोरून ‘ओंकार’ हत्ती येताना दिसला. सुरुवातीला आम्हाला वाटले, तो रस्ता ओलांडून जाईल; पण तो थेट महामार्गाच्या मधोमध उभा राहिला. वाहने थांबली, हॉर्न वाजू लागले; पण त्याला काहीच फरक पडला नाही. त्याने सगळीकडे गोंधळ उडाला. लोक दुचाकी आणि वाहने सोडून बाजूला पळू लागले. काही जणांनी मोबाईलवर व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला; पण हत्तीने हलकासा सोंडेचा आवाज काढत सगळ्यांना थांबवले. त्या क्षणी सगळ्यांच्या अंगावर काटा आला.’’
Kolhapur Rain : कोल्हापूर विभागात ओला दुष्काळ! ऊस उत्पादनात ३५ ते ४० लाख टनांची घट होण्याची शक्यताते म्हणाले, ‘‘बांदा पोलिस आणि वनविभागाचे कर्मचारी लगेच आले. त्यांनी फटाके वाजवले, आवाज केला; पण ओंकार शांतपणे उभाच राहिला. जणू काही त्यालाच रस्ता रोखायचा होता. सुमारे अर्धा-पाऊण तास तो रस्त्यावर उभा होता. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली. काही प्रवासी गाडीतून उतरून रस्त्याच्या कडेला थांबले. वातावरणात एक विचित्र तणाव निर्माण झाला होता.’’
त्यांनी सांगितले, की नंतर फटाक्यांचा आवाज आणि गाड्यांचा गोंधळ पाहून हत्ती हळूहळू वळलाआणि इन्सुलीच्या दिशेने गेला. त्या क्षणी आम्ही सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला. पण हत्ती पुन्हा कुठून, कधी येईल सांगता येत नाही. मागील आठवड्यात मडुरातही त्याने पिकांचे नुकसान केले होते. आता तर महामार्गावरच ठिय्या केला. वनविभागाने आता गंभीरतेने पावले उचलली पाहिजेत. आमच्या रोजच्या जगण्यावर आणि मुलांच्या सुरक्षिततेवर ही परिस्थिती भारी आहे. ‘ओंकार’ पुन्हा आला तर गावकरी किती काळ अशी भीती मनात घेऊन जगणार आहेत?