राज्यात गणित, विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना होणार लाभ
अलिबाग, ता. २६ (वार्ताहर) ः विद्यार्थ्यांचे गणित आणि विज्ञान विषयातील पायाभूत ज्ञान दृढ करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारमार्फत डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी खान अकादमीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. सुमारे ५० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
राज्यातील सुमारे ६२ हजारांहून अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिली ते दहावीसाठी खान अकादमीची जागतिक दर्जाची आणि राज्य अभ्यासक्रमाशी संलग्न असणारी गणित, विज्ञानविषयक शैक्षणिक सामग्री अध्यापन-अध्ययन प्रक्रियेत समाविष्ट केली जाईल. खान अकादमी सहावी ते दहावीसाठी असणारी विज्ञानविषयक शैक्षणिक सामग्री इंग्रजी आणि मराठी भाषेत तसेच महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय, राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मराठी व इंग्रजी भाषेत शिष्यवृत्तीसाठी तयार अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आला आहे. गणित आणि विज्ञान विषयातील प्रत्येक विद्यार्थ्यांचे पायाभूत ज्ञान दृढ करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्य शासनामार्फत डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी खान अकादमीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कुतूहल यांचा वारसा विद्यार्थ्यांमध्ये रुजविणारे प्रख्यात वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबविला जात आहे.
...............
चौकट :
चित्रफित आधारित धडे आणि सराव प्रश्न
चित्रफित वापरून शिक्षक अध्यापन अधिक समृद्ध करू शकतील, तसेच विद्यार्थ्यांना चित्रफित-आधारित धडे आणि सराव प्रश्नांच्या माध्यमातून संकल्पनात्मक आकलन दृढ करण्याची संधी मिळेल. या उपक्रमाद्वारे भौगोलिक व साधनसंपत्तीच्या अडचणी दूर करून, लाखो विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, कुतूहल आणि महत्त्वाकांक्षा यासह शिकण्याची संधी उपलब्ध होईल.