खडकवासला : सिंहगडाच्या पश्चिमेला असलेल्या खरमरी गावातील एका फार्महाउसच्या गोठ्यात बिबट्याने शिरकाव केल्याचे सीसीटीव्हीतील दृश्य सध्या समाजमाध्यमावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्यांना पकडण्यासाठी या भागात त्वरित पिंजरा लावण्याची मागणी नागरिक करत आहेत.
खरमरी गावातील पतंगे यांच्या फार्महाउसमधील पहारेकरी सोपान साळुंखे हे घरी जेवायला गेले होते. तेव्हा बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला परंतु वासरावर हल्ला न करताच बिबट्या माघारी गेला हे दृश्य तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दृश्य कैद झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेजनुसार बुधवारी २२ ऑक्टोबर रोजी रात्री ८.४४च्या सुमारास बिबट्या गोठ्यात शिरल्याचे दिसते. आत एक गीर गाईचे वासरू बांधलेले होते. बिबट्या दिसल्याने वासराची जलद हालचाल सुरू होते. बिबट्या सुरुवातीला सावधपणे पुढे येऊन वासराच्या जवळ जातो. त्याला न्याहाळतो आणि काही क्षणांसाठी हल्ल्याची मुद्रा करतो. अचानकपणे वासरूही भीतीने हालचाल करताना दिसते.
वासरासाठी खाद्य ठेवलेल्या घमेल्यात वासराचा पाय पडल्याने घमेल्याचा आवाज झाला आहे. मात्र पुढच्याच क्षणी बिबट्याने हल्ला न करता मागे वळून शांतपणे तेथून निघून गेला. त्यामुळे वासराचा थोडक्यात जीव वाचला.
मागील तीन चार महिन्यात सिंहगडच्या वाडी वस्तीवर बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. अनेक पाळीव जनावरे या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आहेत. या भागात बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावावेत. वनविभागाने घटनास्थळाचा आढावा घ्यावा अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रेय जोरकर यांनी केली आहे.
बिबट्याच्या हालचालींचा अंदाज बांधता येत नाही. हा पूर्ण वाढ झालेला बिबट्या आहे. जुन्नर आणि शिरूर परिसरात अशा हल्ल्यांच्या घटना वाढल्या असून, अशा भागात तातडीने पिंजरे लावले जातात.
-मनोज बारबोले, वनपरिक्षेत्र अधिकारी
Leopard Attack : शिरूर हादरले! पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात ७० वर्षीय महिलेचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोकोसिंहगड परिसरात पाच ते सहा बिबट्यांचे वास्तव्य आहे. गेल्या महिन्यातच पाच-सहा वेळा नागरी वस्त्यांत बिबट्यांनी शिरकाव केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व वनविभागाशी संपर्क ठेवावा.
-समाधान पाटील, वनपरिमंडळ अधिकारी
बिबट्याचे पोट भरलेले असावे, तसेच ते वासरू बांधलेले असल्याने त्याला शिकार ओढून नेता येत नाही. त्यामुळे बिबट्याने हल्ला केला नाही, असे दिसते. बिबट्याला टक्कर देण्याचा प्रयत्न म्हणून त्याने एकदा मानदेखील बिबट्याच्या दिशेने मारली होती.
-महादेव मोहिते, उपवनसंरक्षक