व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता घातक, 'या' अन्नपदार्थांचा समावेश करा आणि आरोग्य सांभाळा
BBC Marathi October 27, 2025 03:45 AM
Getty Images

व्हिटॅमिन बी-12 आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण अनेकांमध्ये त्याची कमतरता असल्याचे दिसून येते.

आपण जाणून घेणार आहोत की व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेची कारणं, लक्षणं, कोणत्या लोकांमध्ये धोका जास्त आहे आणि ही कमतरता कशी भरून काढता येते.

मे 2025 मध्ये युरोपियन जर्नल ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर मेडिसिनमध्ये भारतातील व्हिटॅमिन (जीवनसत्व) बी-12 च्या कमतरतेवर एक संशोधन लेख प्रकाशित झाला आहे.

या लेखात व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेवर केलेल्या अनेक अभ्यासांचे आकडे (डेटा) विचारात घेण्यात आले आहेत.

या मेटा-विश्लेषणामध्ये 20 अभ्यासांचा समावेश केला होता. यात एकूण 18,750 लोक सहभागी झाले होते. त्यापैकी 51 टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता आढळून आली.

या संशोधनानुसार, सहभागी शाकाहारी लोकांपैकी 65 टक्के लोकांमध्ये बी-12 ची कमतरता दिसून आली.

व्हिटॅमिन बी-12 म्हणजे काय? त्याच्या कमतरतेमुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात? ही कमतरता दूर करण्यासाठी काय करता येईल?

या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आम्ही गुरुग्राममधील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या हेड क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट दीप्ती खाटूजा आणि 'दिल्ली डायट्स'च्या संस्थापक व न्यूट्रिशन तज्ज्ञ अमृता मिश्रा यांच्याशी संवाद साधला.

आपल्याला व्हिटॅमिन बी-12 आवश्यकता का आहे?

शरीरातील अनेक प्रक्रियांसाठी व्हिटॅमिनची आवश्यकता असते. व्हिटॅमिन दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे चरबीमध्ये विरघळणारे व्हिटॅमिन, जसं की व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के.

दुसरा प्रकार म्हणजे पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन्स, जसं की व्हिटॅमिन सी आणि बी-कॉम्प्लेक्स. या बी-कॉम्प्लेक्समध्ये एक महत्त्वाचा व्हिटॅमिन आहे- व्हिटॅमिन बी-12.

दीप्ती खाटूजा म्हणतात की, "व्हिटॅमिन बी-12 हे एक सूक्ष्म पोषक (माइक्रोन्यूट्रिएंट) तत्व आहे. जरी शरीराला याची थोडीशीच गरज असली तरी, ते आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं."

Getty Images

व्हिटॅमिन बी-12 शरीरातील प्रत्येक पेशींसाठी आवश्यक आहे. दीप्ती खाटूजा म्हणतात की, व्हिटॅमिन बी-12 पेशींच्या आत होणाऱ्या महत्त्वाच्या रासायनिक प्रक्रियांमध्ये (केमिकल रिऍक्शन) मदत करतं, जसं की अन्नातून ऊर्जा मिळवणं आणि नवीन पेशी किंवा अणू तयार करणं.

त्या म्हणतात की, हे आपल्या मेंदू आणि नर्व्हस सिस्टिमसाठीही (मज्जासंस्था) खूप महत्वाचं आहे. हे आपल्या रक्तातील पेशी निरोगी ठेवण्यास मदत करतं आणि आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम करतं.

अमृता मिश्रा म्हणतात की, व्हिटॅमिन बी-12 लाल रक्त पेशी तयार करण्यासाठी आवश्यक आहे, जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहोचवतं.

व्हिटॅमिन बी-12 कोणत्या अन्नपदार्थांतून मिळतो?

व्हिटॅमिन बी-12 प्रामुख्याने मांसाहारी पदार्थांमधून मिळतो. वनस्पतींपासून मिळणाऱ्या अन्नात नैसर्गिकरित्या बी-12 नसतो, फक्त जे फोर्टिफाइड म्हणजे खास करून त्यात बी-12 घातलेले असते तेथे मिळतो.

मांस, मासे, अंडी, दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी-12 असते.

Getty Images

व्हिटॅमिन बी-12 अंडी, चिकन, लाल मांस, मासे, सी फूड आणि दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये असतो.

व्हिटॅमिन बी-12 सप्लिमेंट्ससुद्धा उपलब्ध आहेत. अमृता मिश्रा म्हणतात की, हे कॅप्सूल किंवा इंजेक्शनच्या स्वरूपात मिळतात. परंतु, कोणतेही सप्लिमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

दीप्ती खाटूजा म्हणतात, "व्हिटॅमिन बी-12 सप्लिमेंट्स फक्त डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ठरवलेल्या कालावधीसाठी घेता येऊ शकतात."

व्हिटॅमिन बी -12 ची कमतरता

अमृता मिश्रा म्हणतात की, व्हिटॅमिन बी-12 कमी होण्याचं कारण चुकीचा आहार, प्रक्रिया केलेलं अन्न, व्हेगन डाएट आणि पुरेशा प्रमाणात दूध व दुग्धजन्य पदार्थ न घेणं आहे.

त्याचबरोबर जे व्हिटॅमिन बी-12 असलेली उत्पादनं घेतात, परंतु त्यांचं शरीर ते शोषण्यास सक्षम नसतात. अशा लोकांमध्ये देखील त्याची कमतरता उद्भवू शकते. म्हणजे तुम्ही जेवत आहात, पण त्या अन्नाचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसत नाही. याचा अर्थ तुमचे शरीर ते व्यवस्थित पचवत नाही.

Getty Images

शरीराला व्हिटॅमिन बी-12 कसं मिळतं?

आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी-12 पोहोचणं थोडंसं क्लिष्ट आहे. अन्नात व्हिटॅमिन बी-12 प्रथिनांशी (प्रोटीन) जोडलेलं असतं.

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार (एनआयएच), शरीरात व्हिटॅमिन बी-12चे शोषण दोन टप्प्यांत होते. पहिल्या टप्प्यात, पोटातील हायड्रोक्लोरिक अॅसिड अन्नातील प्रथिनांपासून व्हिटॅमिन बी-12 वेगळं करतं.

दुसऱ्या टप्प्यात, प्रथिनांपासून वेगळं झालेले व्हिटॅमिन बी-12 पोटात बनणाऱ्या एका प्रथिनाशी, ज्याला इन्ट्रिंसिक फॅक्टर (आंतरिक घटक) म्हणतात त्याला जोडतो आणि नंतर शरीरात शोषला जातो.

सप्लिमेंट्समधील व्हिटॅमिन बी-12 प्रथिनांशी जोडलेले नसतात, त्यामुळे त्यासाठी पहिल्या टप्प्याची गरज नाही. पण शरीरात शोषण्यासाठी हे बी-12 इन्ट्रिंसिक फॅक्टरशी जोडले जाणे आवश्यक असते.

जर व्हिटॅमिन बी-12 शोषण्याची प्रक्रिया नीट झाली नाही, तर शरीरात याची कमतरता होण्याचा धोका वाढतो.

Getty Images

एनआयएचच्या मते, ज्यांना पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन बी-12 मिळत नाही किंवा ज्यांच्या शरीरात याचं शोषण नीट होत नाही, त्यांना बी-12 कमी होण्याचा धोका असतो. जसं की,

- वयोवृद्ध लोक: वय वाढल्यावर अनेक लोकांच्या पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिड पुरेसं नसतं, त्यामुळे अन्नातील व्हिटॅमिन बी-12 शोषून घेणं कठीण होतं. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बी-12साठी फोर्टिफाइड अन्न किंवा सप्लिमेंट्स घ्यावं लागू शकतं.

- एट्रॉफिक गॅस्ट्रायटिस (जठराची सूज) असलेले लोक: या ऑटोइम्यून (स्वयंप्रतिकार) आजारात पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि इन्ट्रिंसिक फॅक्टरचे उत्पादन कमी होते, त्यामुळे व्हिटॅमिन बी-12 नीट शोषला जात नाही.

- पर्निशियस अॅनिमिया (अपायकारक अशक्तपणा) असलेले लोक: या परिस्थितीत शरीर इन्ट्रिंसिक फॅक्टर तयार करू शकत नाही, जे व्हिटॅमिन बी-12 शोषण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे हे लोक अन्न किंवा सप्लिमेंट्समधून व्हिटॅमिन बी-12 शोषू शकत नाहीत. डॉक्टर सहसा यावर उपचार व्हिटॅमिन बी-12 इंजेक्शनने करतात.

- ज्यांची पोट किंवा आतड्यांची शस्त्रक्रिया झाली आहे: शस्त्रक्रियेनंतर पोटाचा काही भाग काढल्यावर शरीरात हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि इन्ट्रिंसिक फॅक्टर कमी तयार होतो, ज्यामुळे व्हिटॅमिन बी-12 शोषणं कठीण होतं.

- शाकाहारी आणि व्हेगन लोक: जे लोक खूपच कमी किंवा काहीच मांसाहारी अन्न (अॅनिमल फूड) खात नाहीत, त्यांना अन्नातून पुरेसे व्हिटॅमिन बी-12 मिळत नाही.

व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेची लक्षणं आणि शरीरावर होणारे परिणाम

व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेची लक्षणं दिसण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात.

दीप्ती खाटूजा म्हणतात, "व्हिटॅमिन बी-12 कमी होण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे लक्षणं हळूहळू दिसतात आणि नंतर हळूहळू ती गंभीर होतात."

व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेची लक्षणे

- हात किंवा पायांमध्ये विचित्र संवेदना जाणवणं, सुन्नपणा किंवा मुंग्या आल्यासारखं वाटणं

- चालताना अडचण जाणवणं (संतुलन राखण्यात समस्या)

- पर्निशियस अॅनिमिया (अशक्तपणा)

- जीभ सुजणे

Getty Images

- विचार करण्यास किंवा समजून घेण्यास अडचण किंवा स्मरणशक्ती कमी होणे

- अशक्तपणा

- थकवा

- त्वचा पिवळसर होणे

- मूड स्विंग्ज किंवा चिडचिडेपणा

- एकाग्रतेचा अभाव

एखाद्या व्यक्तीमध्ये व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता आहे की नाही, हे व्हिटॅमिन बी-12 लेव्हल टेस्ट नावाच्या रक्त तपासणीतून समजू शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

  • बद्धकोष्ठतेसाठी किवी परिणामकारक? पोट साफ होत नसेल तर ही माहिती वाचा
  • दिवाळीत तूप वापरण्यापूर्वी त्याची शुद्धता कशी तपासायची? घरच्या घरी असं ओळखा
  • https://www.bbc.com/marathi/articles/cq8end5ppl2o
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.