सुनंदन लेले- sdlele3@gmail.com
माझे बालपण गेले ते पुण्यातील वाडा संस्कृतीत. पुढे-मागे अंगण, मोठी चारखांबी ओसरी, विहीर आणि बाग असा सुंदर वाडा होता आमचा. अडचण एकच होती, की १५ घरे मिळून तीनच शौचालये होती. जास्त शहाणपणा करायचा नाही. एकमेकांना मदत करत पुढे जायचे. कधी आपण सांभाळून घ्यायचे तर कधी दुसऱ्याला हक्काने ॲडजस्ट करायला लावायचे.
या गोष्टी भव्यदिव्य विचारातून नव्हे तर सकाळच्या शाैचालयाच्या रांगेतून समजायला वेळ लागायचा नाही. वाड्यात कधी कोणी भुकेला राहायचा नाही. कारण माझी आई गावाला गेली तरी तीन घरांत हात धरून प्रेमाने जेवायला घालायचे. एकप्रकारची आपुलकी सतत जाणवायची. वाड्यात एकाहून एक अवली लोक राहायचे. सतत बोलून खेचाखेची चालू असायची. टिंगलटवाळीला राजमान्यता होती जणू. म्हणून सतत हास्याचे फवारे उडवणारे प्रसंग वाड्यात घडत असायचे. स्मरणात राहतील असे अनेक प्रसंग मला आठवतात; पण त्यातील एक प्रसंग विसरू शकत नाही.
एकदा आमच्या घरी चक्क ४२ माणसे जमा झाली आणि काही आमच्या सोफ्यावर विसावली, काही खुर्च्यांवर विराजमान झाली तर काही मांडी घालून ठाण मांडून बसली. त्याला कारण असे होते, की वाड्यातील पहिला टीव्ही आमच्या घरी आला होता. ईसी नावाच्या हैद्राबादच्या कंपनीचा तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता. वाड्यात मोठा उत्साह पसरला होता. राज कपूरचा ‘तिसरी कसम’ सिनेमा सगळ्यांनी एकत्र आनंदाने बघितला होता. त्यानंतर हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम ‘छायागीत’ आम्ही लावायला विसरलो तरी बाकीचे लोक वेळेवर हजर होऊन आम्हाला ‘लावा की हो तो टीव्ही’ असे म्हणून स्वत:च बटण ऑन करायचे. क्रिकेट सामना अनुभवायला तर दाटीवाटी व्हायची. एकत्र सामना बघायची मजाच काही और होती. इतके लोक घरात गर्दी करतात म्हणून आई-बाबा कधीही नाराज व्हायचे नाहीत की आमच्या कुटुंबाची प्रायव्हसी जातेय, असा विचारही घरात गर्दी करणाऱ्या कोणाच्या मनाला शिवायचा नाही. हे सगळे अगदी अनौपचारिक प्रकारे व्हायचे.
वाडा पडला... मालक-भाडेकरू नाते संपले... घरांचे प्रत्येकाच्या स्वतंत्र मालकीचे फ्लॅट्स झाले. घरात घरातील पोरं, मुली नोकरीला लागली... एक प्रकारची सुबत्ता आली... मग काय घराघरात टीव्ही आले. परिणाम एकच झाला, सुबत्तेने लकवा भरला... कोणी कोणाच्या घरात जाईनासे झाले. मी बरे माझे कुटुंब बरे... सगळ्यांना आपले खासगी आयुष्य जागायची गोडी लागली, ज्याची चव मला तरी कडवट लागते. कारण माणसामाणसातील संवाद आणि आपुलकी अंधुक झाली.
हीच सुबत्ता मला खेळाच्या क्षेत्रात मोठा अडसर ठरताना दिसते आहे. खास करून शहरातील घरात आलेली सुबत्ता खेळाडूंना कठोर परिश्रमांपासून किंवा खडतर वाटेतून मार्ग काढण्यापासून लांब लांब नेत आहे. शहरातील मुलांना आईवडील मागायच्या आत सायकल घेऊन देतात खरे; पण शहरातील गर्दीकडे बघून बरेच पालक सायकलवरून मुलांना शाळेत पाठवायला काळजीपोटी नकार देतात. मग त्या सायकली नव्या कोऱ्या अवस्थेत गंजत पडताना दिसतात. उलटपक्षी गावाकडे सायकली दोन-चार असल्या तरी गावातील पाच-पंचवीस पोरासोरांना सायकल चालवता येत असते. हे बघून अचंबित व्हायला होते. शहरातील पालक मुलांचा इतका अतिरेकी सांभाळ करतात, त्यांची काळजी घेतात, की नंतर त्या मुलांना धाडस म्हणजे नक्की काय असते हेच कळेनासे होते. रोजच्या जीवनात अति काळजीपोटी पालक इतकी टोकाची सोय करून ठेवतात की मुलांना काही शोधायची गरजच पडत नाही. मग धाडस हे स्टेशन खूप नंतर येते.
पुण्यात असताना मी रोज डेक्कन जिमखाना क्लबच्या मैदानावर जातो. जेव्हा शहरातील मुले खेळाच्या प्रशिक्षणाइतकेच महत्त्व खेळाच्या गरजेच्या साहित्याबरोबर बाकी अनावश्यक उपकरणे परिधान करण्यात धन्यता मानताना दिसतात. तेव्हा कुठेतरी गणित चुकल्यासारखे वाटते. क्रिकेट खेळणाऱ्या बहुतांशी मुलांच्या हातात भलीमोठी किटबॅग असते, पाठीला सॅक असते, डोळ्यावर गॉगल असतो, खेळायचे कपडे बॅगेत असतात आणि मैदानावर येण्याचा ड्रेस वेगळा असतो. इतकेच नाही मैदानावर येताना सगळ्यांच्या पायात खेळायचे बूट नव्हे तर खास वेगळ्या फ्लोटर्स म्हणवल्या जाणाऱ्या चपला असतात. काही लोक तर पायमोजे घालून मग त्या चपला घालतात, कारण हार्दिक पंड्या तशा वेशात फिरताना दिसतो.
मुद्दा हाच आहे, की क्रिकेट शिकायला येणारी मुले टीव्हीवर सामना बघताना आंतरराष्ट्रीय खेळाडू कसे खेळतात, या बरोबरीने ते काय घालतात, कसे चालतात, काय वापरतात याकडे लक्ष जरा जास्तच असते. इतकेच नव्हे तर बरेच फलंदाज सराव करताना फलंदाजीचे मूलभूत तंत्र शिकून ते घोटविण्यापेक्षा रिव्हर्स स्वीप पॅडल शॉटसारखे फटके कसे मारायचे याचा शोध घेताना दिसतात. गोलंदाज एका टप्प्यावर सहा चेंडू मला कसे टाकता येतील, याचा विचार मनात पक्का करण्यापेक्षा प्रत्येक चेंडू वेगळ्या प्रकारे कसा टाकता येईल, याचा प्रयत्न करताना दिसतात, तेव्हा हसावे का रडावे कळत नाही. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे पालकांनी कोणताही खेळ मुले शिकू लागल्यावर मूलभूत उपकरणे किंवा किट मुलांना विकत घेऊन देणे अगदी मान्य आहे; पण भरमसाट किमतीच्या अतिरिक्त आणि अनावश्यक शानशोकीच्या उपकरणांसाठी पैसे सहजी देतात कसे, मला कळत नाही.
वेळ आली आहे शहरी पालकांनी जरा मुलांचे लाड कमी करण्याची. सुबत्ता आहे ऐपत आहे म्हणून मुलांना मागताक्षणी सगळे काही विकत घेऊन देणे, त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने मारक ठरत नाही ना, याचा अंदाज पालकांनी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जसे सिनेमाचे माध्यम अजून कळावे, त्यातील बारकावे समजावेत म्हणून फिल्म ॲप्रीसिएशन कोर्स आहे, तसेच खेळाच्या प्रशिक्षकांनी मुलांना एकत्र सामना टीव्हीवर बघत असताना नक्की त्यातले काय बघायचे, काय टिपायचे हे शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्यांची मुले वयाने लहान आहेत, त्या पालकांनी दोन निकष तपासून बघितले तरी मोठे काम होईल. पहिले म्हणजे मैदानावर जाण्यासाठी मुलाला चार वेळ उठवावे किंवा लक्षात आणून द्यायला लागते का मुलगा किंवा मुलगी मैदानावर जाण्याचा हट्ट धरते हे बघा आणि मैदानावर गेल्यावर पालक मुलाच्या पुढे चालत आहेत का, मैदान दिसताक्षणी मूल हात सोडून मैदानाकडे पळत सुटते हे तपासून बघा. तुम्हालाच तुमचे उत्तर कळेल.
Premium| Sports Fandom: मैदानावरील खरा आनंद गेला कुठे? दिखाऊ चाहते का वाढत आहेत?प्रत्येक खेळात वरचा स्तर गाठल्यावर मरणाची चुरस वाढते. दडपण वाढत जाते. मग सरस खेळ करून बाजी मारायला सराव प्रशिक्षण याच्या बरोबरीने धीटपणा लागतो. जर सुबत्तेमुळे सगळेच सहजी उपलब्ध करून दिले तर ती मुले-मुली खेळाच्या सामन्यात झगडून लढत देऊन दडपणाचा सामना करून धाडसाने सरस खेळ कसा करणार, याचा विचार करा, इतकीच विनंती खासकरून सुबत्तेत असणाऱ्या शहरी पालकांना करावीशी वाटते.