पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना उकाडा आणि दमट हवामानाने त्रस्त केले होते. मात्र, गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. तसेच शनिवारीदेखील (ता. २५) शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते.
त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. पुढील दोन दिवसदेखील हवामान स्थिर राहणार असून, पुण्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी शहरातील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून यामध्ये घट होत आहे. शनिवारी शहरात २९ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.
शनिवारी सकाळी शहरात अंशतः ढगाळ वातावरण होते. दुपारी कडक ऊन पडले, तर सायंकाळी परत ढगाळ वातावरण झाले. यामुळे पुणेकरांनी ऊन-सावलीचा खेळ अनुभवला. पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमान राहणार असून, त्यानंतर मात्र त्यामध्ये किंचित वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले.
पुण्यात उन्हाचा कडाका राहणार कायम असा असेल अंदाज...पुणे आणि परिसरात रविवारी (ता. २६) आणि सोमवारी (ता. २७) कमाल तापमान स्थिर राहणार असून, ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस असेल. दुपारी आणि सायंकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मंगळवारपासून (ता. २८) कमाल तापमानात किंचित वाढ होणार असून, कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येणार आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.