युतीच्या निर्णयावर इच्छुकांचे भवितव्य
esakal October 27, 2025 03:45 AM

पावस जिल्हा परिषद गट - लोगो

युतीच्या निर्णयावर इच्छुकांचे भवितव्य
शिवसेना-भाजपमध्ये भाऊगर्दी; दोन्ही शिवसेनेकडे तगडे उमेदवार
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २६ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर पावस जिल्हा परिषद गटात सर्वच पक्षातील इच्छुकांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे महायुती झाल्यास शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना निश्चित आहे. तरीही महायुतीचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. त्यामुळे त्यावरच शिवसेना-भाजपच्या इच्छुक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. महायुती झाली नाही, तर तिरंगी लढत चुरशीची होईल, अशी चर्चा सुरू आहे.
पावस जिल्हा परिषद गट सर्वसाधारण पुरुष गटाकरिता आरक्षित झाल्यामुळे ठाकरे गटाकडून दोघांची, तर भाजपकडून एकाचे नाव पुढे येत आहे. शिंदे शिवसेनेकडूनही दोघांनी इच्छा व्यक्त केल्याची चर्चा सुरू आहे. पावस जिल्हा परिषद गटात ठाकरे शिवसेनेचे वर्चस्व आहे. या मतदारसंघातील गावखडी, पूर्णगड व पावस या परिसरात अल्पसंख्यांक मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच अन्य मतदारांचे पाठबळ ठाकरे शिवसेनेला मिळू शकते. भाजप व शिंदे शिवसेना यांची युती झाल्यास ठाकरे गट विरुद्ध महायुती असा थेट सामना होऊ शकतो; अन्यथा तिरंगी लढतीची शक्यता आहे.
गावखडी पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला गटाकरिता आरक्षित झाल्यामुळे या गणातून ठाकरे शिवसेनेकडून माजी सदस्यांसह दोघींची नावे आहेत, तर शिंदे शिवसेनेकडूनही दोघी इच्छुक आहेत. या गणात उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी भाजपकडून हालचाली नसल्याचे दिसते. पावस पंचायत समिती गण नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता आरक्षित असून, ठाकरे शिवसेनेकडून चौघे आणि शिंदे गटाकडून तिघे इच्छुक आहेत. भाजपकडून अद्याप कुणीही इच्छुक नाही. येथील निर्णय वरिष्ठ पातळीवरून होण्याची शक्यता आहे. तसेच महायुती झाल्यास जिल्हा परिषद गट भाजपकडे आणि गण शिवसेनेकडे असे जागा वाटप होऊ शकते. २०१७ च्या निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजप हे आमनेसामने होते. त्यात गावखडी पंचायत समिती गणात भाजपचे सुशांत पाटकर विजयी झाले, तर जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या आरती तोडणकर आणि पावस पंचायत समिती गणातून कै. सुनील नावले निवडून आले होते. शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना निश्चित आहे.

कोट १
जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण आरक्षण असल्याने यावेळी निष्ठावंतांना संधी द्यावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार आहोत. कारण निष्ठावंतांनी संघटना बांधून ठेवली आहे.
- प्रसाद हळदवणेकर, ठाकरे शिवसेना

कोट २
निवडणूक आली की प्रत्येकाला वाटतं की आपण निवडणूक लढवावी. त्यामुळे प्रत्येक जण इच्छुक असतो. सर्वसाधारण खुला गटाकरिता आरक्षण पडल्याने इच्छुकांची संख्या अधिक आहे. महायुतीच्या माध्यमातून निर्णय होईल, तसे नियोजन केले जाईल.
- सुशांत पाटकर, सदस्य, माजी पंचायत समिती

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.