होमगार्ड, ट्रॅफिक वॉर्डन यांच्यावर हल्ले
esakal October 27, 2025 12:45 AM

पिंपरी, ता. २६ : शहरात वाहतूक नियमन आणि कायदा-सुव्यवस्थेच्या कामात पोलिसांना मदत करणारे होमगार्ड आणि ट्रॅफिक वॉर्डन हे सध्या स्वतःच असुरक्षित झाले आहेत. मागील काही दिवसांत कामावर असताना या कर्मचाऱ्यांवर मारहाण, धक्काबुक्की आणि हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत.
वाहतूक कोंडी, नो-पार्किंग किंवा नियमभंगावरील दंडाच्या वेळी काही नागरिकांचा संयम सुटतो आणि ते कामावरील होमगार्ड किंवा ट्रॅफिक वॉर्डनवर हात उगारतात. अनेक वेळा मद्यधुंद अवस्थेत वाहनचालकांकडून शिवीगाळ, धमक्या आणि हल्ले होत असल्याचेही समोर आले आहे. अशा घटना घडल्यावर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जात असले, तरीही काही जणांकडून हल्ले सुरूच आहेत.

घडलेली घटना
भोसरी येथे मिरवणुकीतील स्पीकर फौजदाराने बंद करण्यास सांगितले असतानाही काही जणांनी पुन्हा मोठ्या आवाजात स्पीकर सुरू केला. त्यावेळी बंदोबस्तावर असलेले होमगार्ड स्पीकर बंद करा सांगण्यासाठी गेले असता दोघांनी त्यांना मारहाण केली. त्यांचे दोन दात पाडून गंभीर जखमी केले.

पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून तैनात
निवडणुका, मिरवणुका, यात्रा बंदोबस्त, व्हीआयपी दौरे तसेच इतर कार्यक्रमासाठी पोलिसांच्या बरोबरीने होमगार्ड व ट्रॅफिक वॉर्डन तैनात असतात. पोलिसांप्रमाणेच ते सर्व परिस्थिती हाताळतात. यामुळे पोलिसांना कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासह वाहतूक नियमन व्यवस्थित ठेवण्यास मदत होते.

होमगार्ड, ट्रॅफिक वॉर्डनची संख्या
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कार्यरत असलेले होमगार्ड - ५६०
महापालिका हद्दीत असलेले ट्रॅफिक वॉर्डन - १९६

प्रत्येक नागरिकाने कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. आपल्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभा असलेला प्रत्येक ट्रॅफिक वॉर्डन, होमगार्ड आणि पोलिस अधिकारी कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासह वाहतूक नियमनासाठीच त्या ठिकाणी उभे असतात. त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यांच्याशी हुज्जत, वाद घातल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते.
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांप्रमाणेच होमगार्डही कर्तव्यावर तैनात असतात. त्यांनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे. मागील आठवड्यात भोसरी येथे घडलेला प्रकार चिंताजनक आहे.
- जालिंदर झंजाड, सहायक समादेशक


कर्तव्यावर असताना किरकोळ कारणावरून होमगार्डवर हल्ल्याचे प्रकार घडतात. आम्ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच कायदा- सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कार्यरत असतो. हे नागरिकांनी लक्षात घ्यायला हवे.
-एक होमगार्ड

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.