मोहोळ - भाजीपाला विक्रीसाठी घेऊन निघालेल्या शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरला एसटी बसने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला. तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले.
हा अपघात रविवार ता 26 रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मोहोळ- पंढरपूर- आळंदी या पालखी महामार्गा वरील पोखरापूर शिवारातील एका वळणावर झाला. अजय राजू काकडे रा खवणी असे जखमीचे नाव असून, त्याला उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. अन्य दोघा जखमींची नावे समजू शकली नाहीत.
मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, ट्रॅक्टर क्रमांक 13 ई एस 0189 हा कोबी व अन्य भाजीपाला घेऊन पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मोहोळच्या दिशेने निघाला होता. त्याच वेळी रत्नागिरी आगाराची एसटी बस क्रमांक एम एच 8 एपी 5724 ही भरधाव मोहोळच्या दिशेने निघाली होती.
दोन्ही वाहने पालखी महामार्गावरील पोखरापूर वळणावर येताच एसटी बस ने ट्रॅक्टरला पाठीमागुन जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती की ट्रॅक्टर पलटी झाला, तर ट्रॉली एका बाजूला जाऊन पडली.अपघाता नंतर एसटी बस दुभाजकावर चढली.
या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून, अधिक तपास अपघात पथकाचे हवालदार अतुल क्षीरसागर करीत आहेत.