गावठी कट्टा बाळगणाऱ्याला अटक
भिवंडी, ता. २५ (वार्ताहर): भिवंडी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने शहरात पोलिस गस्त वाढवण्यात आली आहे. या गस्तीदरम्यान एका गावठी कट्टा बाळगणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. इस्माईल सय्यद उर्फ साजिद काल्या (वय ४५, रा. नदीनाका) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निजामपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संभाजी सपते हे मंगळवारी (दि. २१) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास हद्दीत गस्त घालत असताना त्यांना एक संशयित व्यक्ती वावरताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ १५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आढळून आला. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले आणि त्याच्याविरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून अटक केली आहे.