पादचारी पूल धोकादायक ; पादचाऱ्यांचा जीव धोक्यात
esakal October 28, 2025 04:45 PM

सायन-माटुंगा पादचारी पूल धोकादायक
पादचाऱ्यांचा जीव धोक्यात; नवा बांधण्याची मागणी
धारावी, ता. २७ (बातमीदार) : धारावी येथील धोबीघाट परिसरातील मध्य रेल्वेवरील सायन-माटुंगा रेल्वेस्थानकाच्या दरम्यान असलेला रेल्वेवरून जाणारा पादचारी पूल धोकादायक झाला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. तीन वर्षांपूर्वी रेल्वे व पालिका प्रशासनाने पूल धोकादायक जाहीर करून तो तोडण्याची नोटीस काढली होती, मात्र त्यास स्थानिकांचा विरोध झाल्याने पूल तोडण्यात आला नव्हता.
धारावीतील धोबीघाट येथून सायनच्या दिशेला जाण्यासाठी हा पूल स्थानिकांसाठी जवळचा पर्याय आहे. धारावीतून सायन येथील जैन सोसायटी येथे उतरणारा हा पूल सध्या जीर्ण झाला आहे. पुलाखालून रेल्वे गाड्या जाताना पुलाला हादरे बसत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन पुलावरून जावे लागत आहे. या पुलावरून दररोज हजारो पादचारी ये-जा करतात. पुलावर सतत वर्दळ असते. त्यामुळे अनेकदा गर्दीतून वाट काढत पादचाऱ्यांना मार्गक्रमण करावे लागते.
सायन येथे असलेल्या पालिका शाळा, एस. आय. डब्ल्यू. एस. महाविद्यालय, डी. एस. हायस्कूल, गुरुकृपा शाळा, गुरुनानक महाविद्यालय येथे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना व पालकांना हा पूल अत्यंत गरजेचा आहे. तीन वर्षांपूर्वी पर्यायी पूल अगोदर उभारून नंतर हा पूल पाडावा, अशी मागणी स्थानिकांनी व राजकीय पक्षांनी केली होती. त्यास होकार देत पूल तोडण्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली होती. पर्यायी पूल उभारण्याच्या कामाला सुरुवातसुद्धा झाली होती, मात्र पर्यायी पुलाचे काम पुढे सरकले नाही. त्यामुळे स्थानिकांना जुना पूल वापरावा लागत आहे.
सध्या पुलावर जागोजागी मोठाले तडे गेले आहेत. तसेच पायऱ्यांवरील लाद्या तुटलेल्या आहेत. यातूनच मार्ग काढत लहान विद्यार्थ्यांना पालक घेऊन जात आहेत. जुनाट झालेला पूल कोसळून एखादी दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल स्थानिक रहिवासी करत आहेत. यासंदर्भात स्थानिक आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी याबाबत माहिती घेऊन कार्यवाही करते, असे ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

जवळपास ४० वर्षे जुना असलेला पादचारी पूल तोडून नव्याने बनवावा. एखादी दुर्दैवी घटना घडण्याअगोदर पर्यायी पूल बनवून जुन्या पुलाचे नूतनीकरण केले गेले पाहिजे.
- बाबाजी घुले, स्थानिक समाजसेवक

पुलाची डागडुजी केली गेली पाहिजे. पुलासंदर्भात रेल्वे व पालिका प्रशासन गंभीर नाहीत. लोकांच्या जीविताशी खेळ होत आहे.
- एन. आर. पॉल,
धारावी तालुका अध्यक्ष, आप पक्ष.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.