धुळे: शासनाच्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेतील अनिवार्य ई-केवायसी प्रक्रियेला अखेर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे हप्ता मिळण्यास विलंब होत असलेल्या लाखो लाभार्थी महिलांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते आता मिळणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारसाठी ‘गेमचेंजर’ ठरलेल्या या योजनेसाठी राज्याच्या आर्थिक ताणाचा विचार करून सरकारने अलीकडेच ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची केली होती. मात्र तांत्रिक अडचणी आणि हप्ता मिळण्यात आलेल्या अडथळ्यांमुळे महिलावर्गात मोठी नाराजी पसरली होती. महिलांमधील हा असंतोष लक्षात घेऊन आणि विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महिलावर्गाची नाराजी टाळण्यासाठी सरकारने ई-केवायसीला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
हप्ता लवकरच खात्यात
या स्थगितीमुळे आता ऑक्टोबर महिन्याचा एक हजार ५०० रुपयांचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. योजनेचा वेग वाढला असून, ऑगस्ट २०२५ पर्यंत १४ हप्त्यांचे वितरण पूर्ण झाले आहे, तर सप्टेंबरसाठीचा निधीही उपलब्ध आहे. दिवाळी सणातच हा दिलासा मिळाल्याने अनेक ‘लाडक्या बहिणीं’नी आनंद व्यक्त करत सरकारचे आभार मानले.
कारवाईची भीती कायम
दरम्यान, ई-केवायसीला स्थगिती असली तरी योजनेच्या निकषांची पडताळणी करताना अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेतून वगळण्याची प्रशासकीय प्रक्रिया शासनाने कायम ठेवली आहे. यामध्ये प्रामुख्याने चारचाकी वाहनधारक महिला, केंद्र-राज्य सरकारच्या अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी, शासकीय सेवेतील कर्मचारी, एकाच कुटुंबातील अनेक लाभार्थी भगिनी तसेच वयाची चुकीची नोंद किंवा निकषांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांचा समावेश आहे.
राजकीय मलमपट्टीची चर्चा
हा निर्णय प्रशासकीय असला तरी यामागे स्पष्ट राजकीय गणित दडलेले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महिलांच्या नाराजीचा सूर ओसरून आगामी निवडणुकांपूर्वी सरकारविषयीचा विश्वास परत मिळवण्यासाठी ही तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून, या निर्णयाला ‘राजकीय मलम’ म्हणून पाहिले जात आहे.
CM Devendra Fadnavis: ५५ हजार ९६९ कोटींचे सामंजस्य करार, अर्थव्यवस्थेला बळ मिळणार; मुख्यमंत्र्यांची माहितीजिल्ह्यातील सद्यःस्थिती
जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत एकूण पाच लाख २३ हजार ७८२ महिला लाभार्थी आहेत. यात धुळे तालुक्यात दोन लाख तीन हजार ४८६, साक्री तालुक्यात एक लाख २६ हजार ३२३, शिंदखेडा तालुक्यात ८५ हजार १२, तर शिरपूर तालुक्यात एक लाख आठ हजार ९६१ महिलांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोठी दमछाक होत होती. स्थगितीच्या निर्णयाने बहिणींना दिलासा मिळाला आहे.