मोरगाव, ता. २८ : मोरगाव (ता. बारामती) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (ता. २८) तब्बल २८ वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा दिला.
रयत शिक्षण संस्थेचे श्री मयुरेश्वर माध्यमिक व विद्यालयात सन १९९६- ९७ च्या दहावीच्या वर्गातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. यावेळी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्वप्रथम विद्यालयातील एका वर्गात सर्वजण एकत्र जमले होते. यावेळी नियोजित कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली.
नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने विविध ठिकाणी, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले या सर्व मित्रांची स्नेहमेळाव्यानिमित्त भेट झाली. हे सर्व माजी विद्यार्थी २८ वर्षानंतर शाळेच्या आवारात एकत्र जमले होते. कार्यक्रमासाठी तत्कालीन सर्व शिक्षकांना विशेष निमंत्रण देऊन सन्मानित केले. यावेळी शालेय जीवनामधील आठवणी, वास्तविक जीवन, शिक्षकांबद्दलच्या आठवणी यांची चर्चा करत विद्यार्थी दिवसभर रमून गेले होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वितेसाठी मोरगाव तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष प्रकाश तावरे, दादा माडकर, नवनाथ तावरे, सचिन यादव यांच्या ग्रुपने सहकार्य केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी या पुढील काळात निरपेक्ष भावनेतून मैत्रीचे बंध दृढ करत अडचणीच्या काळात एकमेकांना प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या भावनेतून मदत करण्याचा निर्धार केला.
03298