प्राचीन काळात सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत आणल्याची कथा आपण सर्वांनीच ऐकली असेल. त्याचीच आठवण म्हणून महाराष्ट्रात आजही अनेक विवाहीत महिला वटपौर्णिमेचे व्रत करतात, उपासही ठेवतात. मात्र आजच्या टेक्नॉलॉजीच्या, आधिनिक युगात, एका आधुनिक सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजाच्या दारातून खेचून आणत त्यांना नवे जीवन दिले आहे. करमाळा तालुक्यातील पोंधवडी येथे ही हृदयस्पर्शी घटना नुकतीच समोर आली आहे. पतीच्या दोन्ही किडन्या निकामी झालेल्या असताना, पत्नी रूपाली साळवी यांनी स्वतःची किडनी दान करून पतीला जीवनदान दिले. विशेष म्हणजे, यासाठी त्यांना सासर आणि माहेरच्या लोकांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. त्यांच्य या प्रेमाची, त्यागाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
टेम्पो चालवून करायचे उदरनिर्वाह
निखळ प्रेमाचे प्रतीक आणि त्यागाची असणारी ही कथा वाचून कोणाच्याही डोळ्यात अश्रू येतील. करमाळा तालुक्यातील पोंधवडी येथील संजय साळवे हे टेम्पो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे.
मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली, डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी तपासणी केली असता, त्यांनी जे सांगितलं ते ऐकून साळवे आणि कुटुंबीय हादरलेच. साळवे यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान डॉक्टरांनी केलं.
त्यानंतर करमाळ्यातील मोफत डायलिसिस सेंटरमध्ये ते उपचार घेऊ लागले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळ्यात हे मोफत डायलिसिस सेंटर सुरू केले आहे. संजय साळवे येथे डायलिसिससाठी येत असताना त्यांनी आपली संपूर्ण अडचण महेश चिवटे यांना सांगितली. चिवटे यांनी तातडीने आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या मदतीने उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून त्यांना सर्वतोपरी आरोग्य सुविधा पुरवली.
जगण्याची आशाच सोडली पण पत्नीने दिलं जीवनदान
संजय साळवे फार काळ जगणार नाहीत, असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर साळवे कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. पण संजय यांची पत्नी रुपाली यांनी हिंमत सोडली नाही, त्यांनी नवऱ्याचे उपचार सुरू ठेवले. काहीही झालं तरी आपल्या पतीला जीवनदान मिळवून द्यायचंच असा दृढ निश्चय त्यांनी केला. त्यानंतर या आधुनिक सावित्रीने, स्वतःची किडनी पती संजय यांना देण्याचा धाडसी निर्णय घेतला.
कुटुंबियांनी केला विरोध, मात्र निर्णयावर ठाम
पण त्यांचा हा निर्णय रूपाली यांच्या माहेरचे आणि सासर, दोन्हीकडील लोकांना पटला नाही, त्यांनी रुपालीला खूप विरोध केला. ‘असा वेड्यासारखा निर्णय घेऊ नकोस, तुझ्या लेकरा-बाळांचा विचार कर,’ असंही अनेकांनी रुपाली यांना समजावलं. मात्र एवढं सगळं होऊनही रुपाली त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या, त्यांनी कोणाचंच ऐकलं नाही. अखेर सर्वांचा विरोध कडाडून डावलून रुपाली यांनी आपल्या पतीसाठी किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.
आज, साळवे दाम्पत्य सुखरूप असून, रूपाली साळवी यांच्या अतुलनीय त्यागामुळे संजय साळवे यांना पुनर्जन्म मिळाला आहे. सासर आणि माहेरचा विरोध झुगारून केवळ पतीवरील निस्सीम प्रेमापोटी घेतलेल्या या निर्णयामुळे रूपाली साळवी या खऱ्या अर्थाने आजच्या युगातील ‘आधुनिक सावित्री’ ठरतात. त्यांच्या या कृतीने पतीला तर नवा जन्म मिळालात, पण कुटुंबाला आणि गावालाही मोठा दिलासा मिळाला आहे.