लहानग्यांच्या कलाविष्काराला कौतुकाची थाप
esakal October 29, 2025 06:45 PM

पुणे, ता. २८ ः ‘सकाळ एनआयई’तर्फे यापूर्वी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धा २०२५च्या पुणे आवृत्तीच्या प्रमुख बक्षिसांचा वितरण समारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते उत्साहात झाला.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्हा परिसरातील राज्य पातळी, जिल्हा पातळी, (ऑफलाइन-ऑनलाइन) स्पर्धेतील सर्वसाधारण, आश्रमशाळा, विशेष मुले, पालक व ज्येष्ठ नागरिक यांचा या
सर्व विभागातील विजेते विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना प्रशस्तिपत्र व विभागवार रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार
करण्यात आला. सकाळ माध्यम समूहाच्या विविध प्रकाशनांचे व्यंग्यचित्रकार आलोक निरंतर, सुप्रसिद्ध चित्रकार, कलाशिक्षक व सकाळ चित्रकला स्पर्धेचे परीक्षक गोपाळ नांदुरकर व ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीचे वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) गिरीश टोकशिया हे व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. घोले रस्ता परिसरातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात हा कार्यक्रम झाला.
या प्रसंगी आलोक म्हणाले, ‘‘मुलांच्या कलागुणांना लहानपणापासूनच वाव देणे आवश्यक आहे. पालक व शिक्षक यांनी त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना करू द्याव्यात.’’ तसेच त्यांनी यावेळी त्यांना बालपणीच्या आठवणी व चित्रकलेच्या आवडीविषयी अनुभव सांगितले.
नांदुरकर यांनी गेली अनेक वर्षे सकाळ चित्रकला स्पर्धेच्या परीक्षण कामकाजाच्या अनुभव व कार्यपद्धतीबाबत माहिती दिली. तसेच गेल्या काही वर्षांत विशेष (दिव्यांग) मुलांच्या वाढत चाललेल्या लक्षणीय सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला. सध्याच्या डिजिटल युगात चित्रकलेसारख्या कलेला महत्त्व दिले गेले पाहिजे. ‘एआय’च्या युगात मुलांना आपल्या मनाप्रमाणे विचार करता येत नाही, तो करणे आवश्यक आहे, असे नमूद केले. सूत्रसंचालन, प्रास्ताविक, पाहुण्यांची ओळख व आभार प्रदर्शन संतोष कुडले (वरिष्ठ व्यवस्थापक - वितरण इव्हेंट्स) यांनी केले.

लाखो विद्यार्थ्यांचा सहभाग
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यव्यापी ‘सकाळ एनआयई-चित्रकला’ स्पर्धा २ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आली होती. या स्पर्धेत लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी राज्यभरातून शालेय विद्यार्थी, विशेष विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी, तसेच पालकांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठीदेखील खुली होती. यातील शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा (इयत्ता पहिली ते दहावी) निवडलेल्या स्पर्धा केंद्रावर प्रत्यक्ष (ऑफलाइन) झाली. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने झाली. ऑनलाइन सहभागी स्पर्धकांनी चित्रकलेच्या वेबसाइटवर चित्रे अपलोड केली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.