वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी आतापासूनच संघाची बांधणी केली जात आहे. कोण संघात असेल आणि कोण कोणत्या जागेवर खेळेल याचा अंदाज घेतला जात आहे. खरं तर टीम इंडिया आठव्या स्थानावर फलंदाजी आणि गोलंदाजी करेल अशा खेळाडूचा शोध घेत आहे. या स्थानासाठी टीम इंडियाला फिरकी गोलंदाजाऐवजी वेगवान गोलंदाजाची आवश्यकता आहे. यासाठीच हार्षित राणाचा विचार केला जात आहे शार्दुल ठाकुरचा या जागेवर डोळा आहे. कारण संघात पुन्हा स्थान मिळावायचं तर हे स्थानच योग्य ठरू शकते. शार्दुल ठाकुर अष्टपैलू खेळाडू आहे. पण त्याचा फॉर्म हा चिंतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे त्याला इंग्लंड कसोटी मालिकेनंतर संघात स्थान मिळालं नाही. त्यामुळे आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न आहे.
मुंबईचा रणजी ट्रॉफी कर्णधार शार्दुल ठाकुरने आठव्या जागेसाठी आपला दावा ठोकला आहे. रेव्ह स्पोर्टशी बोलताना शार्दुल ठाकुरने स्पष्ट केलं की, ‘वनडे वर्ल्डकप स्पर्धा दक्षिण अफ्रिकेत होत आहे. त्यामुळे आठव्या क्रमांकावर गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूला संधी मिळू शकते. मी त्या जागेसाठी प्रयत्नशील आहे. मी तयारीतच आहे. जर मला उद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सांगितलं तर मी तयार असेन.’ दरम्यान, शार्दुल ठाकुर मागच्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाचा भाग होता. बांगलादेशविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.
शार्दुल ठाकुरचं टीम इंडियातील कमबॅक पूर्णपणे देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीवर अवलंबून असणार आहे. शार्दुल ठाकुर म्हणाला की, ‘सामने खेळत राहणे आणि चांगली कामगिरी करणे हे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. भारतीय संघात कमबॅकसाठी मला सामना जिंकवणारी कामगिरी करणं आवश्यक आहे. त्यामुळेच संघात निवड होण्यास मदत होईल.’ शार्दुल ठाकुरला टीम इंडियात पदार्पणासाठी खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. खूप खेळाडू यासाठी रांगेत आहेत. पण शार्दुलने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली तर नक्कीच विचार केला जाईल.