1995 पासून ते आजपर्यंत, गेल्या तीस वर्षांत भारत आणि परदेशातील लाखो लोकांनी ‘नीस्डेन मंदिर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध लंडन BAPS स्वामीनारायण मंदिराला भेट दिली आहे. हे मंदिर परमपूज्य प्रमुख स्वामी महाराजांनी बांधले. या मंदिराला भेट देणाऱ्यांमध्ये सामान्य नागरिकांपासून ते अनेक प्रतिष्ठित मान्यवरांपर्यंत पाहुण्यांचा समावेश आहे. मंदिराची दिव्य आभा ही प्रत्येक पर्यटकाच्या हृदयावर अमिट छाप सोडते.
ब्रिटनचे राजा, चार्ल्स तृतीय आणि त्यांची पत्नी राणी कॅमिला यांनी नुकतीच निस्डेन मंदिराला भेट दिली. दिवाळी आणि हिंदू नववर्षाच्या उत्साही वातावरणात आणि मंदिराच्या तीन दशकांच्या (30 वर्षांच्या) वर्धापन दिनानिमित्त, शाही जोडप्याने मंदिराला भेट दिली.
या शानदार प्रसंगी, लंडन बीएपीएस स्वामीनारायण मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री जितूभाई पटेल यांनी शाही परिवाराचे स्वागत केले. वेल्सचे राजकुमार आणि कॉर्नवॉलच्या डचेस म्हणून मागील भेटींनंतर, राजा आणि राणी म्हणून चार्ल्स तृतीय आणि कॅमिला यांची मंदिराला ही पहिलीच भेट होती. राजघराण्यातील व्यक्तींनी मंदिराला अशा अनेक भेटी दिल्या असून, त्यामधून BAPS हिंदू समुदायाशी असलेले त्यांचे दीर्घकालीन आणि प्रेमळ नाते अधोरेखित होतं.
1995साली मंदिराचे उद्घाटन झाल्यापासून, नीस्डेन मंदिर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र बनले आहे. भक्ती, सेवा आणि भारतीय संस्कृतीचे एक अद्वितीय प्रतीक असलेल्या या मंदिराने बाल आणि युवा विकास, ज्येष्ठ नागरिकांची काळजी, आरोग्य आणि मानवतावादी मदत यासारख्या विविध सेवा उपक्रमांद्वारे ब्रिटिश समाजात सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

आपल्या भेटीदरम्यान, शाही दांपत्याने मंदिरातील स्वयंसेवक तसेच भक्त समुदायाची भेट घेतली, त्यांच्याकडून मंदिराच्या कार्याबद्दल माहिती देखील जाणून घेतील. यामध्ये द फेलिक्स प्रोजेक्टसोबतच्या मंदिराच्या दीर्घकालीन भागीदारीचा समावेश आहे, – ही लंडनमधील एक धर्मादाय संस्था आहे जी दुर्बल लोकांची भूक भागवण्यासाठी अतिरिक्त अन्नाचे पुनर्वितरण करते. एवढंच नव्हे तर हे सेवाकार्य किंग चार्ल्सच्या राज्याभिषेक अन्न प्रकल्पाचा एक अविभाज्य भाग देखील आहे.
मंदिराला दिलेल्या भेटीदरम्यान, शाही जोडप्याने पॅरिसमधील BAPS स्वामीनारायण हिंदू मंदिराबद्दल देखील जाणून घेतले, सप्टेंबर 2026 मध्ये त्याचे उद्घाटन पार पडणार आहे. ते फ्रान्समधील पहिले पारंपारिक हिंदू मंदिर असेल. शाही दांपत्याने मंदिर बांधकाम प्रकल्प पथकातील प्रमुख सदस्यांचीही भेट घेतली.
“या ऐतिहासिक प्रसंगी नीस्डेन मंदिरात शाही जोडप्याचे स्वागत करताना भक्त समुदायाला आनंद होत आहे. त्यांच्या मैत्रीबद्दल आणि मंदिराच्या सामाजिक सेवा कार्यात त्यांच्या सततच्या रसाबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो” असे लंडन मंदिराचे मुख्य कार्यवाहक संत योगविवेकदास स्वामी यांनी नमूद केलं.

जगभरातील बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे आध्यात्मिक प्रमुख, परमपूज्य महंत स्वामी महाराज यांनी भारतातील व्हिडिओ संदेशाद्वारे राजघराण्यासाठी प्रार्थना आणि आशीर्वाद दिले. “तुमच्या (अनेक) दशकांच्या सार्वजनिक सेवेदरम्यान, तुम्ही श्रद्धेला महत्त्व दिले आणि धर्मांमधील सुसंवाद वाढवला आहे; आज तुमची येथे उपस्थिती याचा पुरावा आहे.” असे ते म्हणाले.
या व्यतिरिक्त परम पूज्य महंत स्वामी महाराज यांनी किंग चार्ल्स यांना वैयक्तरिक पत्र देऊन संपूर्ण युके (देश)ची प्रगति आणि समृद्धीसाठी आशीर्वाद दिले. मंदिराच्या सामाजिक आणि आध्यात्मिक सेवा कार्यात अमूल्य योगदान देणाऱ्या स्वयंसेवकांच्या समर्पणाची आणि सेवेची प्रशंसा करत, शाही जोडप्याने निरोप दिला.