झारखंड टोळीचे मुंब्र्यात सूत्रधार
अमेरिकी डॉलरच्या प्रलोभनातून अनेकांची फसवणूक
नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) ः स्वस्त दरात अमेरिकी डॉलरचे प्रलोभन दाखवून मुंबईतील एका तरुणाकडून तीन लाखांची रक्कम घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणातील सहा आरोपींना मुंब्रा येथून पोलिसांनी अटक केली आहे. झारखंड गँगशी ही टोळी संबंधित असल्याचे तपासात आढळले आहे.
कांदिवलीतील मोहम्मद सिद्दीकी (३३) यांच्याशी संपर्क साधून या टोळीने अमेरिकी डॉलर स्वस्त दरात देण्याचे प्रलोभन दाखवले होते. रफीक असे सांगणाऱ्या टोळीतील एका सदस्याने मोहम्मद सिद्दीकी यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर १,७५१ डॉलर असल्याचा खोटा बनाव रचताना या टोळीने सिद्दीकी यांना घणसोलीत बोलावून तीन लाखांच्या बदल्यात नोटांच्या आकाराचे कागदी बंडल देऊन पोबारा केला होता. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात अज्ञात टोळीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्हीच्या आधारे शिळफाटा, मुंब्रा परिसरातून मोहम्मद राहुल लुकमान शेख ऊर्फ रफीक (३५), आलमगीर आलम सुखखू शेख (२७), खोसमुद्दीन मोहम्मद शेख ऊर्फ येलीम (२३), रिंकू अबुताहीर शेख (२६), रोहिम बकसर शेख (३४), अजीजुर सादिक शेख (३७) ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
--------------------
फसवणुकीचे दोन गुन्हे
या टोळीच्या चौकशीत त्यांचा झारखंड गँगशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्याकडून रबाळे पोलिस ठाण्यातील आणखी दोन फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिली.