महापालिकेची ऑनलाइन सेवा विस्कळीत
कल्याण-डोंबिवलीत नागरिकांना मनस्ताप
कल्याण, ता. २८ (वार्ताहर): कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयासह दहा वॉर्डांमधील पाणी बिल, मालमत्ता कर भरणा आणि जन्म-मृत्यू दाखला यांसारख्या ऑनलाइन सेवांची प्रणाली गेल्या चार दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. वेबसाइट आणि ॲप्लिकेशनमधील तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांना नाहक हेलपाटे मारावे लागत असून तीव्र अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांमधील ( सीएफसी) ऑनलाइन प्रणाली चार दिवसांपासून बंद असल्याने कर भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. सोमवारीही मोठ्या संख्येने नागरिक बिल भरण्यासाठी आले होते, पण सिस्टीम बंद असल्याने कोणताही व्यवहार करणे शक्य झाले नाही.
पाणी आणि मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत संपलेली असताना, ऑनलाइन प्रणाली पूर्ववत न झाल्यामुळे बिल भरण्यास विलंब होत आहे. यामुळे नागरिकांना दंड भरावा लागेल की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. नागरिकांनी प्रशासनाला थेट सवाल केला आहे की, चूक महानगरपालिका प्रशासन किंवा कंत्राटदार कंपनीची असताना, विलंबाची शिक्षा नागरिकांना का दिली जात आहे?
प्रशासनाची हतबलता
तांत्रिक विभागातील एका अधिकाऱ्याने (नाव न सांगण्याच्या अटीवर) सांगितले की, ऑनलाइन सेवा पुरवणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या वेबसाइटमध्ये गेल्या चार दिवसांपासून तांत्रिक बिघाड झाला आहे, ज्याचा प्रशासनाशी थेट संबंध नाही. मात्र, संबंधित कंपनीशी संपर्क साधण्यात अडचणी येत असल्याने समस्या अधिक गंभीर होत असून प्रशासन हतबल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
तात्पुरती व्यवस्था
हा व्यत्यय गेल्या शुक्रवारपासून सुरू आहे. दोन दिवसांत बिघाड दूर करण्याचे आश्वासन दिले असतानाही चार दिवस उलटून प्रणाली पूर्ववत झाली नाही, परिणामी नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. सीएफसी कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी अंदाजे तीन वाजता सीएफसीचा सर्व्हर पुन्हा सुरू झाला असला तरी, तो अजूनही खूप हळू चालत असल्याची माहिती सीएफसी कर्मचाऱ्यांनी दिली. सध्या नागरिकांच्या सोयीसाठी कर्मचारी हाताने पावत्या देऊन तात्पुरत्या स्वरूपात बिले स्वीकारत असल्याचे चित्र आहे.