बोगद्यातून पाणी दृष्टिपथात
esakal October 29, 2025 06:45 PM

पुणे, ता. २८ : जलप्रदूषण रोखण्याबरोबरच पाण्याची बचत करणाऱ्या आणि पर्यावरणपूरक असलेल्या खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याच्या प्रकल्पाचे काम अखेर सुरू झाले आहे. येत्या तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे बंधन ठेकेदार कंपनीवर आहे, तर काम पूर्ण झाल्यानंतर पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्नही काही प्रमाणात या प्रकल्पामुळे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान २८ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी येण्याची योजना जलसंपदा विभागाकडून तयार करण्यात आली आहे. जलसंपदा विभागानेच तयार केलेल्या या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवालास मुख्य अभियंता आणि त्यांनतर राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती (स्टेट लेव्हल टेक्निकल अॅडव्हायजरी कमिटी) आणि राज्य सरकारकडून यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे सुमारे अडीच टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याची बचत होणार आहे, तर अतिरिक्त ३ हजार ४७२ हेक्टरवरील क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. त्याप्रमाणे जलप्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे.
मागील वर्षी मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या कामासाठी जलसंपदा विभागाकडून तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. पात्र ठरल्याने या कंपनीची निविदा मान्यता देऊन विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच वर्क ऑर्डर देण्यात आली; परंतु सहा महिन्यांनंतरही पर्यावरण खात्याचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ न मिळाल्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकले नव्हते; परंतु नुकतेच केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याच्या केंद्रीय जल समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर झालेल्या चर्चेत प्रकल्पास पर्यावरण खात्याची ‘एनओसी’ देण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा झाल्यामुळे प्रत्यक्षात जागेवर कामास सुरुवात करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

महत्त्वाचे
१) खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याचे जलसंपदा विभागाकडून निश्चित
१२) ७.८० मीटर रुंद, ३.९० मीटर उंच आणि १.९५० मीटर गोलाकार उंची अशा ‘डी’ आकाराचा बोगदा
३) सुमारे २८ किलोमीटर लांबीचा बोगदा
४) बोगद्यामुळे कालव्याची क्षमता १५१० क्युसेक होणार
५) सर्व पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने फुरसुंगीपर्यंत नेण्यात येणार
६) पाण्याचे प्रदूषण, गळती आणि बाष्पीभवन रोखण्यास मदत
७) सुमारे अडीच टीएमसी पाणी वाचणार

पर्यावरण खात्याचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ठेकेदार कंपनीने प्रत्यक्ष जागेवर कामास सुरुवात केली आहे.
- एच. व्ही. गुणाले, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.