बिअर पिताय, सावधान! कल्याणमध्ये बिअर पिणे तरुणाला पडले महागात, थेट हॉस्पिटलमध्ये दाखल
Tv9 Marathi October 29, 2025 06:45 PM

कल्याण पश्चिम परिसरामध्ये एक्सपायरी डेट (मुदत संपलेली) झालेली बिअर विकून ग्राहकांच्या जीवाशी खेळण्याचा एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेम आटो परिसरातील रियल बिअर शॉप मधून मुदत संपलेली बिअर प्यायल्याने अजय म्हात्रे नावाच्या तरुणाची प्रकृती चिंताजनक बनली आहे. अजय म्हात्रे याच्यावर सध्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार सुरू आहेत.

नेमकं काय घडलं?

कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा भागात राहणारे अजय म्हात्रे यांनी सोमवारी रात्री रियल बिअर शॉपमधून दोन बिअरच्या बाटल्या खरेदी केल्या. घरी जाऊन त्यांनी बिअरचे सेवन केले. काही वेळातच त्यांना तीव्र अस्वस्थता, पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांची तब्येत अचानक खालावली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कुटुंबियांनी त्यांना त्वरित रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले.

अजय म्हात्रे यांची तब्येत बिघडल्याचे आणि याचे कारण बिअर असल्याचे लक्षात येताच त्यांच्या काही मित्रांनी तात्काळ रियल बिअर शॉप गाठले. तेथे चौकशी केली असता, त्यांना दुकानात काही बिअरच्या बाटल्यांची मुदत उलटून गेली असल्याचे स्पष्ट दिसले.

या गंभीर प्रकाराची माहिती अजय म्हात्रे यांच्या मित्रांनी त्वरित महात्मा फुले पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी हे प्रकरण राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निदर्शनास आणून दिले. या माहितीच्या आधारे, उत्पादन शुल्क विभागाने रियल बिअर शॉपवर तातडीने छापेमारी केली. अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत दुकानाच्या गोदामात मोठ्या प्रमाणात एक्सपायरी डेट उलटून गेलेल्या बिअरच्या बाटल्यांचा साठा आढळला. हा सर्व मुदतबाह्य साठा उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.

कठोर कारवाई करण्याची मागणी

एका व्यक्तीचा जीव धोक्यात घालणाऱ्या या बेजबाबदार कृत्याबद्दल नागरिकांमध्ये आणि अजय म्हात्रे यांच्या मित्र परिवारात तीव्र संताप व्यक्त होत आहे. एक्सपायरी डेटचा माल विकणाऱ्या अशा दुकानदारांवर केवळ दंड नव्हे, तर दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा. तसेच त्यांच्यावर अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

या प्रकरणी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग पुढील तपास करत आहे. या दुकानमालकाविरोधात कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर विक्रीमुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्यांवर कठोर पायंडा पाडण्याची गरज व्यक्त होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.