राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांची पत्रकार परिषद आज कचनार शहरात पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखील भारतीय कार्यकारी मंडळांच्या वार्षिक बैठकीबाबत महत्त्वाची माहिती दिली. संघाच्या अखील भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला येत्या 30 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे, 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे, ही बैठक जबलपूर जिल्ह्यात होणार आहे, अशी माहिती सुनील आंबेकर यांनी दिली आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, संघाच्या दृष्टिकोनातून भारताच्या 46 प्रांतांमधून 407 कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांच्यासह सहा सह कार्यवाह आणि अखिल भारतीय कार्यकारिणीसह सर्व 11 प्रदेश आणि 46 प्रांतांमधील संघचालक, कार्यवाह तसेच प्रांतीय प्रचारक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती यावेळी सुनील आंबेकर यांनी दिली आहे.
संघाच्या शताब्दी वर्षाला नागपूरमध्ये 2 ऑक्टोबर 2025 रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रारंभ झाला आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उपस्थिती होती, तसेच या कार्यक्रमात दलाई लामा यांच्या शुभ संदेशाचं वाचन देखील करण्यात आलं, या कार्यक्रमात 14101 संघ स्वयंसेवक सहभागी झाले होते, असंही यावेळी आंबेकर यांनी म्हटलं आहे.
30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या संघाच्या अखील भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये मंडळ स्तरावर होणाऱ्या हिंदू परिषदा, जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या प्रमुख नागरिकांच्या बैठका, सामाजिक सलोखा बैठक, आणि तरुणांसाठी आयोजित करण्यात येणारे विविध कार्यक्रम या गोष्टींवर प्रामुख्यानं चर्चा होणार आहे.समन्वित पद्धतीने सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी एकत्र कसे काम करू शकतो, यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं आंबेकर यांनी म्हटलं आहे.
सरसंघचालक मोहन भागवत हे त्यांच्या देशव्यापी दौऱ्यामध्ये विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे, ते या कार्यक्रमांमध्ये संघाबद्दल त्यांचे विचार व्यक्त करणार आहेत. या दौऱ्यामध्ये 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी त्यांचं बंगळुरूमध्ये भाषण होणार आहे, त्यानंतर 21 डिसेंबर रोजी ते कोतकाता येथे भाषण करणार आहेत आणि 7 व 8 फेब्रुवारी 2026 रोजी ते मुंबईमध्ये भाषण करतील अशी माहिती देखील यावेळी आंबेकर यांनी दिली आहे.