कऱ्हाड: मामाच्या गावी गेलेल्या येथील सहावीतील ओवी सचिन जगताप हिने खेळताना सापडलेला पाच तोळे सोन्याचा हार प्रामाणिकपणे परत केला. पुसेगाव (ता. खटाव) येथील सेवागिरी मंदिरात हा प्रकार घडला.
येथील पालिकेचे माजी नगरसेवक सुहास जगताप यांची ओवी ही पुतणी आहे. तिच्या प्रामाणिकपणाबद्दल सेवागिरी ट्रस्टतर्फे तिचा सत्कार व कौतुक केले. माजी नगरसेवक सुहास जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांची कन्या ओवी येथील एसएमएस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सहावीत शिकते. दिवाळीच्या सुटीला ती आजोळी पुसेगाव येथे गेली होती. खेळताना तिला घराच्या मागील बाजूस पाच तोळे सोन्याचा हार सापडला.
ओवीने क्षणाचाही विचार न करता तो हार घरातील मोठ्यांकडे आणून दिला. घरच्यांनी तातडीने सेवागिरी मंदिरात त्याबाबत चौकशी केली. त्यावेळी तो हार दर्शनासाठी आलेल्या परगावच्या एका आजींचा असून, तो हरवल्याचे समजले. त्यांनी तो हार ओळख पटवून त्या आजींना परत केला. त्यावेळी त्या आजीच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. ओवीच्या प्रामाणिकपणाबद्दल आजींसह सेवागिरी मंदिर ट्रस्टने ओवीचा सत्कार करून कौतुक केले. शहरातही ओवीचे कौतुक होत आहे.