मालेगाव: येथील दरेगाव भागातील शफी पार्क परिसरातून गुजरात येथील ३० वर्षीय भामट्याने सहावर्षीय मुलाला पैशांचे आमिष दाखवून रिक्षामधून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सजग नागरिकांनी वेळेवर हस्तक्षेप करून मुलाची सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, दरेगाव येथील शफी पार्क परिसरात मोमीन तालीफ मोमीन तौसिफ (वय ६) हा मुलगा खेळत होता. त्या वेळी सलीम मुन्ना आलम (वय ३०, रा. अंकलेश्वर, गुजरात) या व्यक्तीने त्याला पैशांचे आमिष दाखवून रिक्षात बसविले. त्यानंतर तो तालीफला मुंबई-आग्रा महामार्गावरील स्टार हॉटेल परिसराकडे घेऊन जात होता.
रस्त्यात सलीम हा त्या चिमुकल्याला मारहाण करीत असल्याचे तेथील व्यावसायिकांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ रिक्षा थांबवून विचारपूस केली असता, संशयिताने उडवाउडवीची उत्तरे दिली. शंका आल्याने नागरिकांनी त्याला अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, व्यावसायिकांनी तालीफकडून त्याच्या वडिलांचा मोबाईल क्रमांक घेतला आणि घटनेची माहिती दिली. तालीफचे पालक तातडीने घटनास्थळी पोहोचले व मुलाला सुरक्षित ताब्यात घेतले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
Pune Crime : रूपेश मारणेला नऊ महिन्यांनी अटक, आयटी अभियंता हल्ला प्रकरण; ‘मकोका’अंतर्गत गंभीर गुन्हे दाखलसलीम मुन्ना आलम हा मालेगावातील एका फेअर कंपनीत काम करतो. त्याने मुलाला पळविण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी मोमीन तौसिफ जमील इकबाल (वय ३४) यांनी पवारवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी सलीम मुन्ना आलम याला अटक केली असून, त्याला मंगळवारी (ता. २८) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवन सुपनर करीत आहेत.