IND vs AUS 1st T20I: ओव्हर्स कमी होण्यामागे पाऊस नव्हे, तर भलतंच कारण! तुम्हाला कळलं तर म्हणाल, आमच्या इथे असं कधी होत नाही...
esakal October 30, 2025 10:45 AM

Australia vs India1st T20I Marathi News : पावसाच्या बॅटिंगमुळे क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला ट्वेंटी-२० सामना कॅनबेरा येथे खेळवला जातोय. पण, ९ षटकांत दोन वेळा पावसाने खोडा घातला. पहिल्यांदा पाऊस पडल्याने षटकांची संख्या कमी झाली आणि सामना प्रत्येकी १८ षटकांचा खेळवण्याचा निर्णय झाला. आता पुन्हा पाऊस आल्याने षटकांची संख्या आणखी कमी होईल हे निश्चित आहे. पण, षटकं कमी होण्यामागे पाऊसच कारण नाही, तर भलतंच कारण आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी ( Nitish Kumar Reddy) याला दुखापतीमुळे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांना मुकावे लागणार आहे. सामन्यात पावसाने खोडा घातला आणि त्यामुळे षटकांची संख्या प्रत्येकी १८-१८ अशी करण्यात आली आहे. पाऊस पडण्यापूर्वी भारताच्या ५ षटकांत १ बाद ४३ धावा झाल्या होत्या. अभिषेक शर्मा १९ धावांवर झेलबाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवव शुभमन गिल यांनी मोर्चा सांभाळला.

सूर्याने जॉश हेझलवूडला मारलेला षटकार चर्चेचा विषय ठरला. पण, पाऊस थांबल्यानंतर सुरू झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या मैदानावर भारतीय फलंदाजांना मोठे फटके खेचता येत नव्हते. ९व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गिलच्या खणखणीत षटकारानंतर सूर्याने पुढील षटकात सलग दोन चौकार खेचले. यासह दोघांनी ३१ चेंडूंत अर्धशतकीय भागीदारी पूर्ण केली. ९.४ षटकानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला आणि खेळाडूंना डग आऊटमध्ये जावे लागले. तेव्हा भारताच्या १ बाद ९७ धावा झाल्या होत्या.

दरम्यान, षटकं कमी होण्यामागे फक्त पाऊसच कारणीभूत नाही. समालोचकांनी या मागचं खरं कारण सांगितलं. स्थानिक प्रशासनाच्या "लाइट्स आऊट" नियमामुळे षटकांची संख्या कमी करण्यात आली, असल्याचा दावा cricbuzz ने केला आहे आणि हे ऐकून अनेक क्रिकेटप्रेमी थक्क झाले आहेत.

IND vs AUS 1st T20I : एवढा लाड! Harshit Rana वरून नेटिझन्सनी गौतम गंभीरला झोडले; फलंदाजीतही दिलंय प्रमोशन, अर्शदीप पुन्हा बळीचा बकरा...

स्थानिक वेळेनुसार रात्री ११ वाजता मैदानाच्या परिसरातील लाईट्स बंद करण्याचा नियम असल्याने सामना पूर्ण २० षटकांचा खेळवता येणार नाही. जरी पावसामुळे थोडा विलंब झाला, तरी ती फार मोठी अडचण नव्हती; मात्र २३:०० नंतर फ्लडलाइट्स बंद ठेवण्याच्या प्रशासनिक नियमामुळे अम्पायरांना षटकांची संख्या कमी करावी लागली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.