IRCTC : इच्छा नसताना ट्रेनमध्ये घ्यावे लागेल जेवण? आयआरसीटीसी ने गुपचूप केला तो मोठा बदल
Tv9 Marathi November 01, 2025 09:45 PM

Train, Railway Food : वंदे भारत, शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस सारख्या ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांना खिशाला भूर्दंड बसणार आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) गुपचूपपणे एक मोठा बदल केला आहे. ट्रेनेच्या तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. यामध्ये “नो फूड ऑप्शन” विना जेवण तिकीट बुक करण्याचा पर्याय हटवला आहे. या निर्णयामुळे प्रवाशी नाराज झाले आहेत. कारण त्यांना आता इच्छा नसतानाही रेल्वेतील जेवणासाठी 300 ते 400 रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च करावे लागतील.

नो मीलचा पर्याय हटवला

यापूर्वी ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांना “नो मील” वा “नो फूड” हा पर्याय निवडण्याची मुभा होती. ज्यांना रेल्वे प्रवासादरम्यान जेवणाची गरज नााही. त्यांना हा पर्याय निवडता येत होता. पण आता आयआरसीटीसीची साईट अथवा ॲपवर ही सुविधा दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांना गरज नसताना भूर्दंड सहन करावा लागत आहे. त्यांना जेवणाचा प्रकार, शाकाहारी, मांसाहारी आणि जैन पद्धतीच्या जेवणाची निवड करावी लागत आहे.

प्रवाशांमध्ये नाराजी

प्रवाशांनी सोशल मीडियावर या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे अनेक प्रवाशांनी एक्सवर त्यांच्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. अगदी गुपचूपपणे आयआरसीटीसीने हा सगळा प्रकार केल्याचा दावा प्रवाशी करत आहेत. तिकीट बुक करताना त्यांना आता माहिती न देताच जेवणाचे पैसे वसूल केल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.एका प्रवाशाने ट्वीट केले आहे की मी केवळ तीन तासांसाठी प्रवास करणार आहे. तरीही मला जेवणासहीत तिकीट खरेदी करावे लागले. हा प्रवाशांच्या खिशावर दरोडा आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे काय?

इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार, नो फुडचा पर्याय पूर्णपणे हटविण्यात आलेला नाही. तर त्याची जागा बदलवण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली की, हे जेवण ऑप्ट आऊट करण्याचा पर्याय त्याच पेजवर आहे. थोड बारकाईने पाहिल्यास हा पर्याय दिसतो. पण प्रवाशांना हा पर्याय लवकर समोर येत नसल्याने नाराजी पसरली आहे. त्यांनी रेल्वे प्रशासनावर तोंडसुख घेतले आहे. ही प्रवाशांची फसवणूक असल्याचा दावा प्रवाशी करत आहेत. लवकर हा पर्याय पूर्वीच्या ठिकाणी आणण्याची मागणीप्रवाशांनी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.