अमेरिका आणि रशियातील तणाव युक्रेन युद्धामुळे वाढत आहे. याची झळ आता युक्रेन, रशिया आणि अमेरिकेपर्यंत मर्यादित न राहता जगातील अनेक देशांपर्यंत पोहोचलीये. 1990 च्या दशकात सुरू असलेली अण्वस्त्रांची स्पर्धा हळूहळू कमी होत चालली होती. मात्र, आता पुन्हा एकदा जग विनाशाकडे जाताना दिसत असून ही स्पर्धा पुन्हा एकदा पेटताना दिसत आहे. एकेकाळी अण्वस्त्र निःशस्त्रीकरणासाठी पुढाकार घेणारे देश आता त्यांचे शस्त्रास्त्रांचे साठे वाढवण्याबद्दल बोलत आहेत आणि हे भविष्यासाठी अत्यंत घातक आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अलिकडेच अण्वस्त्र चाचण्यांबद्दल बोलून जगाला धक्का दिला. सर्वाधिक अण्वस्त्र साठे आज अमेरिकेत आहेत आणि तीच अमेरिका हे साठे वाढवण्याची भाषा करताना दिसतंय.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्रकारांनी विचारले की, खरोखरच अमेरिका भूमिगत अणुस्फोटाची योजना आखत आहे का? यावर बोलताना ते स्पष्टपणे म्हणाले की, होय आम्ही काही चाचण्या करणार आहोत… इतर देशही हे करत आहेत, जर त्यांनी केले तर आपणही करू. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट दिसत आहे की, आता त्यांची याबद्दलची भूमिका बदलली आहे. अमेरिकेचे बदलते धोरण जगासाठी मोठा धोका बनलंय.
जागतिक पॉवर गेम्सचा धोकाही वाढला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या चाचण्या क्षेपणास्त्रांच्या असतील की अण्वस्त्रांच्या असतील हे स्पष्ट केले नाहीये. मात्र, त्यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे अमेरिका 30 वर्षांनी अण्वस्त्रांची चाचणी करू शकते, याचे संकेत आहेत. रशियाने देखील अमेरिकेसोबत केलेला अण्वस्त्रांबाबतचा करार मोडला आहे. त्यानंतर अमेरिकेनेही आपली भूमिका बदलल्याचे बघायला मिळतंय.
युक्रेन युद्धामुळे रशिया आणि अमेरिकेतील संबंध ताणले आहेत. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका विविध प्रकारे रशियावर दबाव टाकत आहे. रशियाने करार तोडल्यानंतर अमेरिका देखील मैदानात उतरलीये. युक्रेनने देखील अमेरिकेकडे धोकादायक क्षेपणास्त्रांची मागणी केली. रशियाने चेतावणी देत थेट म्हटले की, तुम्ही जर ही क्षेपणास्त्रे युक्रेनला दिली तर परिस्थिती अधिक गंभीर होईल. निश्चितपणे रशियाचे नुकसान होईल. मात्र, आम्ही आमच्या देशाची आणि नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी सदैव तयार आहोत.