Womens World Cup 2025 Final: पहिल्या वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिका-इंडियात रस्सीखेच, दोघांपैकी वरचढ कोण? पाहा आकडे
GH News November 01, 2025 10:11 PM

आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामना हा रविवारी 2 नोव्हेंबरला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. महामुकाबल्यात यजमान टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघ वर्ल्ड कप ट्रॉफीपासून फक्त 1 पाऊल दूर आहेत. मात्र दोघांपैकी कोणत्या एका संघाचं विश्व विजेता होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. तर एका संघाला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागेल. दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. तर अंतिम सामन्याआधी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत कशी कामगिरी केलीय? तसेच दोघांपैकी कोण वरचढ आहे? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

दक्षिण आफ्रिकेची अंतिम फेरीत पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा पहिल्याच झटक्यात वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला भारताची फायनलमध्ये पोहचण्याची यंदाची तिसरी वेळ आहे. भारताचं याआधी 2 वेळेस वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंग झालं आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांची 2 दशकांपासून वर्ल्ड कप जिंकण्याची प्रतिक्षा आहे. तसेच टीम इंडिया यजमान आहे. त्यामुळे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

साखळी फेरीतील पराभवाचा सेमी फायनलमध्ये हिशोब

दोन्ही संघांसमोर उपांत्य फेरीत कडवं आव्हान होतं. दक्षिण आफ्रिकेसमोर इंग्लंडचं आव्हान होतं. तर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 हात करणार होती. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीत दक्षिण आफ्रिका आणि भारताला लोळवलं होतं. त्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया यांच्या उपांत्य फेरीतील कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष होतं. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला पराभूत करत साखळी फेरीतील पराभवाची अचूक परतफेड केली. तर भारताने कांगारुंचा विजय रख रोखत पहिल्या पराभवाचा हिशोब केला. त्यामुळे आता दोन्ही संघांना वर्ल्ड कप ट्रॉफीच वेध लागले आहेत.

साखळी फेरीतील दोन्ही संघांची कामगिरी

दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाच्या तुलनेत सरस कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीत 7 पैकी 5 सामने जिंकले. दक्षिण आफ्रिकेने 10 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये तिसरं स्थान मिळवलं. तर भारताला 7 पैकी फक्त 3 सामन्यांमध्येच विजय मिळवता आला. भारताने 3 सामने गमावले. तर भारताचा आणि साखळी फेरीतील शेवटचा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. अशाप्रकारे भारताने 7 पैकी 3 सामने जिंकले आणि तितकेच गमावले. मात्र त्यानंतरही भारताने उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं.

महिला ब्रिगेडची विजयी सलामी

भारताने या मोहिमेतील आपले पहिले सलग 2 सामने जिंकत अप्रतिम सुरुवात केली. भारताने श्रीलंका आणि पाकिस्तानचा धुव्वा उडवत चाहत्यांची मनं जिंकली. मात्र त्यानंतर महिला ब्रिगेडच्या कामगिरीमुळे टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहचतेय की नाही? अशी स्थिती निर्माण झाली होती. भारताने सलग 2 विजयानंतर पराभवाची हॅटट्रिक लगावली. भारताला दक्षिण आफ्रिका, गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभूत व्हावं लागलं.

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना अखेरच्या क्षणी गमावला. भारतीय संघ या सामन्यात मजबूत स्थितीत होती. मात्र अखेच्या काही षटकात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला बॅकफुटवर ढकललं आणि विजय मिळवला. त्यानंतर टीम इंडियाला 330 धावा करुनही ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभूत व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियाने 331 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. भारताने सलग दुसरा सामना गमावला. इंग्लंड विरुद्ध भारताने जिंकलेला सामना गमावला. इंग्लंडने हा सामना अवघ्या 4 धावांनी जिंकला आणि महिला ब्रिगेडेने पराभवाची हॅटट्रिक पूर्ण केली.

टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ सामना

त्यानंतर टीम इंडियाचा साखळी फेरीतील सहावा सामना न्यूझीलंड विरुद्ध होता. भारतासाठी हा सामना म्हणजे आर या पार असाच होता. या सामन्यात भारताने विजय मिळवला भारताने हा सामना डीएलएसनुसार 53 धावांनी जिंकला. भारताने या विजयासह उपांत्य फेरीत धडक दिली. तर बांगलादेश विरुद्ध साखळी फेरीतील सामना पावसामुळे अखेरच्या क्षणी रद्द करण्यात आला. पावसाने भारतीय संघाला चौथ्या विजयापासून रोखलं.

लाजिरवाणा पराभव आणि विजयी पंच

दक्षिण आफ्रिकेची स्पर्धेतील सुरुवात अतिशय लाजिरवाणी झाली. इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेने 10 विकेट्सने धुव्वा उडवला. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने मागे वळून पाहिलं नाही. दक्षिण आफ्रिकेने सलग 5 विजय मिळवत दणक्यात कमबॅक केलं.

दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड, टीम इंडिया, बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध विजयी धांवाचा पाठलाग करताना विजय मिळवला. तर पाकिस्तानवर 150 धावांनी मात केली. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ रोखला. दक्षिण आफ्रिकेचा अशाप्रकारे साखळी फेरीतील शेवटही पराभवाने झाला. मात्र दक्षिण आफ्रिकेने या पराभवाचा परिणाम उपांत्य सामन्यावर होऊ दिला नाही. दक्षिण आफ्रिकेने पुन्हा कमबॅक केलं आणि सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा हिशोब केला.

दोन्ही संघ तुल्यबळ

दोन्ही संघांचे एकमेकांविरूद्ध वर्ल्ड कप स्पर्धेतील आकडे पाहता दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया तुल्यबळ आहेत. मात्र गेल्या 3 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा बोलबाला राहिला आहे. दोन्ही संघांनी वर्ल्ड कप स्पर्धेत एकमेकांविरुद्ध प्रत्येकी 3-3 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघ पहिल्यांदा 1997 साली वर्ल्ड कप स्पर्धेत आमनेसामने आले होते. तेव्हापासून भारताने पहिले सलग 3 सामने जिंकले. भारताने दक्षिण आफ्रिकेला 1997, 2000 आणि 2005 साली पराभूत केलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा हिशोब केला.

दक्षिण आफ्रिकेने 2017 साली पराभूत करत वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील टीम इंडिया विरुद्धचा पहिला विजय मिळवला. त्यानंतर 2022 साली दक्षिण आफ्रिकेने भारताला पराभवाची धुळ चारली. तर 9 ऑक्टोबरला भारताला पराभूत करत दक्षिण आफ्रिकेने विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली.

महिला ब्रिगेड इतिहास घडवणार?

दरम्यान टीम इंडिया या स्पर्धेत हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात खेळतेय. हरमनप्रीत भारतीय संघातील सक्रीय असलेली सर्वात अनुभवी खेळाडू आहे. तसेच हरमनप्रीतचा हा कॅप्टन म्हणून पहिला तर खेळाडू म्हणून पाचवा वर्ल्ड कप आहे. भारताला आतापर्यंत वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यामुळे हरमनप्रीत कौर कॅप्टन आणि एकूण खेळाडू म्हणून भारताला पहिलावहिला वर्ल्ड कप जिंकून द्यावा, अशी इच्छा क्रिकेट चाहत्यांची आहे.

दोघांपैकी वरचढ कोण?

दरम्यान आतापर्यंत उभयसंघात एकूण 34 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेने त्यापैकी 13 सामने जिंकले आहेत. 1 सामन्याचा निकाल लागला नाही. तर भारताने सर्वाधिक 20 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे आता टीम इंडिया 21 वा आणि ऐतिहासिक विजय मिळवत मायदेशात वर्ल्ड कप मिळवते का? हे येत्या काही तासांतच स्पष्ट होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.