Gaganbawada Kolhapur Political News : मांडुकली (ता. गगनबावडा) येथील लोकनियुक्त सरपंच राजाराम तुकाराम पाटील यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव ३९६ मताधिक्क्याने मंजूर झाला. आज झालेल्या ग्रामसभेत चुरशीने मतदान होऊन अविश्वास ठरावाच्या बाजूने ६१२, तर ठरावाच्या विरोधात २१६ मते पडली. ४८ मते बाद झाली. यामुळे येथील सरपंचपद रिक्त झाले आहे. अध्यासी अधिकारी म्हणून गगनबावड्याच्या गटविकास अधिकारी अलमास सय्यद यांनी काम पाहिले.
आज सकाळी ८ ते ११ या वेळेत ग्रामसभेला सुरुवात झाली. यावेळी ९०४ मतदार उपस्थित होते. एवढ्याच मतदारांना ११ ते ४ या वेळेत मतदानाचा अधिकार मिळाला. मांडुकली येथील ग्रामपंचायत निवडणूक डिसेंबर २०२२ मध्ये झाली होती. या निवडणुकीत सदस्यांच्या सात जागा बिनविरोध झाल्या होत्या.
मात्र, सरपंचपद व एका प्रभागातील सदस्यांच्या दोन जागांसाठी निवडणूक झाली होती. सरपंचपदासाठी तिघे जण रिंगणात होते. सरपंचपदाच्या निवडणुकीत राजाराम पाटील हे ३४० मतांनी विजयी झाले होते. पण, सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणे, गावच्या विकासकामांत टाळाटाळ करणे, अशी कारणे पुढे करून ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल केला होता.
Kolhapur Police Recruitment : कोल्हापूर जिल्हा पोलिस दलात ८८ जागांसाठी भरती प्रक्रिया, कुठे, कसा कराल अर्ज?यावर १० ऑक्टोबरच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष सभेत मतदान घेऊन आठ विरुद्ध दोन, असे मतदान होऊन अविश्वास ठराव मंजूर झाला होता. या अविश्वास ठरावास संमतीसाठी आज विशेष ग्रामसभा झाली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गगनबावड्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ फौजफाट्यासह दिवसभर तळ ठोकून होते. तहसीलदार गणेश गोरे यांनी सायंकाळी या ठिकाणी भेट दिली.
तालुक्यातील पहिलीच घटना
गगनबावडा तालुक्यात लोकनियुक्त सरपंचांवर अविश्वास ठराव आणण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे आजच्या मतदानाकडे लक्ष लागून राहिले होते.