Heartwarming Video: "श्रेयसला सुखरूप घरी आण देवा..." सूर्यकुमार यादवच्या आईची प्रार्थना, BCCI ने दिले अपडेट्स...
esakal October 29, 2025 10:45 PM

BCCI gives Shreyas Iyer health update after injury: भारताच्या वन डे संघाचा उप कर्णधार श्रेयस अय्यर याच्या दुखापतीने सर्वांनी चिंता वाढवली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात झेल पकडताना श्रेयस मैदानावर कोसळला आणि त्याच्या बरगड्यांना मार लागला. हा मार एवढा जोरदार होता की त्याच्या शरिरात रक्तस्त्राव झाला. बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमने तातडीने हालचाली केल्या, म्हणून श्रेयसवरील धोका टळला. पण, त्याला उपचारांसाठी सिडनीच्या हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. बीसीसीआयने दिलेल्या अपडेट्सनुसार त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओने सर्वांची मनं जिंकली आहेत.

सूर्यकुमार यादवव श्रेयस हे दोघंही मुंबईकर आणि चांगले मित्र आहेत. काल सूर्यानेही श्रेयसची दुखापत कळताच फोन केल्याचे सांगितले होते. त्याला सोबतच मायदेशात घेऊन जाऊ असे तो म्हणाला. आज त्याच्या आईने छट पूजेदरम्यान श्रेयस अय्यरच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आणि इतरांनाही श्रेयससाठी प्रार्थना करा असे आवाहन केले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

सूर्यकुमार यादव काल काय म्हणाला होता?

सूर्या म्हणाला होता की, श्रेयसला दुखापत झालीय हे माहीत होताच मी त्याला फोन केला.. पण, त्याच्याजवळ फोन नव्हता. मग मी फिजीओ कमलेश जैन यांना फोन करून श्रेयसची विचारपूस केली. त्यांनी सांगितलं की तो आता बरा आहे. आता दोन दिवसांपासून त्याच्यासोबत बोलणं होतंय. आता तो फोनवर बोलतोय म्हणजे, तो बराच असेल. त्याच्यासोबत डॉक्टरही आहेत. त्याला काही दिवस अजून डॉक्टरांच्या देखरेखीखाली रहावे लागेल.

BCCI UPDATES ON SHREYAS INJURY

२५ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरच्या पोटाला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याच्या प्लीहाला दुखापत झाली होती आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता. दुखापतीची त्वरित ओळख पटली आणि रक्तस्त्राव त्वरित थांबवण्यात आला. त्याची प्रकृती आता स्थिर आहे आणि तो अजूनही निरीक्षणाखाली आहे.

मंगळवार, २८ ऑक्टोबर रोजी केलेल्या स्कॅनमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे आणि श्रेयस बरा होण्याच्या मार्गावर आहे. बीसीसीआय वैद्यकीय पथक, सिडनी आणि भारतातील तज्ञांशी सल्लामसलत करून, त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवत राहील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.