 
            मागाठाण्यातील समस्यांवर उपाययोजना करा
प्रवीण दरेकरांचे पालिका आयुक्तांना साकडे
मुंबई, ता. ३० ः मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांवर उपाययोजना करून तत्काळ कार्यवाही करण्यासाठी गुरुवारी (ता. ३०) भाजपा गटनेते व महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी मुंबई महापालिका कार्यालयात आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले. 
आमदार प्रवीण दरेकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिलेल्या निवेदनात येथील महत्त्वाच्या प्रश्नांचा उल्लेख आहे. दहिसर पूर्व, चेकनाका ते समतानगरदरम्यानचा सेवा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करून अनधिकृत रिक्षा, दुचाकी गॅरेज, सर्व्हिस सेंटरवर कारवाई करावी. संजीवनी हायस्कूल वैशालीनगर ते पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंतचा रस्ता खुला करावा. शिववल्लभ क्रॉस रोड, ठाकूर कम्पाउंड, राजतरंग बिल्डिंगसमोरील डीपी रोड विकसित करावा. रावळपाडा येथील प्रसूतिगृहातील आरोग्यसेवा-सुविधांची माहिती मिळावी. मारुतीनगर येथील डीपी रस्ता चालू करावा. अशोकवन पालिका शाळा विकसित करावी. संभाजीनगर, अशोकवन, दहिसर (पूर्व) येथील पालिकेची मंडई सुरू करावी. संभाजीनगर येथील नाला आच्छादित करावा, असे निवेदनात म्हटले आहे. 
 पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अतिक्रमणे काढावीत. वॉर्ड क्रमांक २५ येथील आकुर्ली प्रसूतिगृहाचे नूतनीकरण करून मल्टिस्पेशालिस्ट रुग्णालयाची निर्मिती करावी. ठाकूर व्हिलेज येथे अग्निशमन केंद्र निर्मितीला वेग द्यावा. मौजे पोईसर स्मशानभूमीच्या आरक्षणात बदल करून त्या ठिकाणी वाहनतळ, मंडई मार्केटची निर्मिती करावी. ठाकूर कॉलेजसमोरील रस्ता, ठाकूर व्हिलेजमधील भूमिगत वाहनतळाची निर्मिती, सिंग इस्टेटमधून लोखंडवाला येथे जाणाऱ्या १२० फुटी रस्त्याची निर्मिती यांना वेग द्यावा. 
सकारात्मक चर्चा
मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील अनधिकृत फेरीवाल्यांच्या जागा निश्चित कराव्यात. ठाकूर व्हिलेज परिसरात महापालिकेच्या जलतरण तलावाची निर्मिती करावी. कांदिवली (पूर्व) येथील समतानगर पालिका शाळा आणि मागाठाणे मतदारसंघातील पालिकेचे उद्यान/मैदाने विकसित करावीत, या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यासंदर्भात आयुक्तांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.