Rahul Gandhi: नितीश यांचा 'रिमोट' मोदींच्या हाती'': राहुल गांधींची टीका
esakal October 31, 2025 04:45 PM

नालंदा : नितीश यांचा रिमोट आता मोदी आणि शाह यांच्या हातात आहे. बिहारमधील विकास फक्त भाषणांपुरता मर्यादित राहिला आहे, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहार नालंदा येथे आयोजित सभेत गुरुवारी केली.

राहुल यांनी त्यांच्या भाषणामध्ये बिहारमधील विकास, बेरोजगारी, आरोग्य व्यवस्था, उद्योग क्षेत्र आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरही जोरदार टीका केली.

राहुल म्हणाले, ‘‘मी ज्या राज्यात जातो तिथे मला बिहारचे लोक काम करताना दिसतात. दुबई असो, बंगळूर किंवा मुंबई. बिहारच्या लोकांनी या शहरांचा पायाभूत आराखडा आपल्या घामाने आणि कष्टाने उभे केला आहेत.

पण प्रश्न असा आहे की हीच मेहनत आणि ऊर्जा बिहार घडविण्यासाठी का वापरली जात नाही? बिहारच्या युवकांमध्ये प्रचंड क्षमता आहे, पण व्यवस्थाच अशी आहे की त्यांच्या प्रतिभेला संधी मिळत नाही.’’ बिहारमध्ये इंडिया आघाडीची सत्ता आल्यास नालंदा येथे पुन्हा जागतिक दर्जाचे विद्यापीठ उभारू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. बिहारमधील शिक्षण व्यवस्था ढासळली आहे, मात्र येथील मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा रिमोट कंट्रोल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हातात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Amit Shah: बिहारमधील जनताच सूड घेईल; अमित शहा, इंडिया आघाडीचा पराभव होणार असल्याचा दावा

या वेळी बोलता राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही जोरदार टीका केली. राहुल म्हणाले, “देशात विषमतेची दरी वाढत आहे. एक भारत अदानी, अंबानी आणि नरेंद्र मोदींचा आहे . जिथे स्वच्छ पाणी, सरकारी कंत्राटे व उद्योग आहेत; तर दुसरा भारत गरीब, शेतकरी आणि मजुरांचा आहे, जिथे अस्वच्छ पाणी, महागाई व बेरोजगारी आहे.”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.