 
            बॅनरबाजीनंतर विद्युत रोषणाईवर कारवाई
मुंबई महापालिकेची आठवडाभर मोहीम
कांदिवली, ता. ३० (बातमीदार) ः झाडांवर दिव्यांच्या माळा, विद्युत रोषणाई करण्यास उच्च न्यायालय आणि हरित लवाद यांनी मनाई केली असली तरी यंदाही मोठ्या प्रमाणावर दिवाळीत झाडांवर रोषणाई करण्यात आली. विद्युत रोषणाई हटवण्यासाठी मुंबई महापालिकेने आठवडाभराची मोहीम हाती घेतली आहे.
आर दक्षिण उद्यान विभागाचे सहाय्यक उद्यान अधीक्षक सचिन पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली झाडांना, फांद्यांना विद्युत रोषणाईपासून मुक्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.
कांदिवली आर दक्षिण विभागात कांदिवली पूर्व आणि पश्चिमेला झाडांवर, फांद्यांवर व्यावसायिक, संस्था आदींनी मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली आहे. महापालिकेने साप्ताहिक मोहीम हाती घेतली आहे. स्वामी विवेकानंद मार्ग, महात्मा गांधी मार्ग, काड सिद्धेश्वर मार्ग, मथुरादास मार्ग, आकुर्ली मार्ग ठाकूर व्हिलेज आणि हनुमान नगर अशा अनेक मार्गांवर व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपला व्यवसाय दिसता क्षणी नजरेत भरावा यासाठी दुकानांसमोरील झाडांवार एलईडी पाइपलाइन गुंडाळल्या आहेत. फांद्यांवर लाइट सोडली आहे. काही संस्थांनी आपल्या इमारतीच्या परिसरात असलेल्या झाडांवर विद्युत रोषणाईंचा झगमगाट केला आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात विजेचा वापर करण्यात आला आहे. फटाक्यांचा आवाज आणि विद्युत रोषणाईचा झगमगाट यामुळे झाडांवरील कीटक कृमी, पक्षी आणि इतर जीवांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 
आर दक्षिण उद्यान विभागाने काढलेले विद्युत दिवे, एलईडी माळा जप्त केल्या आहेत. झाडांवरील दिव्यांच्या माळा, रोषणाई उतरवण्यासाठी पालिका उद्यान विभाग यंत्रणा कामाला लागली आहे. 
आर दक्षिण विभागाचे सहाय्यक उद्यान अधीक्षक सचिन पारखे म्हणाले, सर्वप्रथम मुख्य मार्गांतील झाडांवरिल विद्युत दिवे, माळा आणि एलईडी काढण्यात आली आहे. मथुरादास आणि चारकोप येथील मुख्य मार्गांवरील विद्युत दिवे काढण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.