मोरगाव, ता. २ : मोरगाव (ता. बारामती) ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात असलेला इमानकया व आंब्याचा मळा पाझर तलाव कोरडा झाला आहे. त्यामुळे पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या व्यवस्थापनाने यामध्ये पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हे तलाव भरल्यास भरल्यास रब्बी व उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. येथील सोनार शेत तलाव यावर्षी पूर्णपणे भरला आहे. मात्र, इमानकया व आंब्याचा तलाव यामध्ये पाणी नसल्याची परिस्थिती आहे. तलावाच्या भराव्याची भिंत कमकुवत झाली असून पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे तलाव आवश्यक ठिकाणी डागडुजी करून दुरुस्त करण्याची गरज आहे.
मात्र, हा तलाव नेमका कोणत्या सरकारी विभागाकडे आहे याची माहिती शेतकऱ्यांना नसल्यामुळे पाठपुरावा नेमका कोणाकडे करायचा याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. तलावाच्या परिसरात जवळपास शंभर ते दीड दीडशे विहिरींची संख्या असून तलाव कोरडा पडल्यानंतर विहिरींचीही पाण्याची पातळी पूर्णपणे खालावली जात आहे. उपकालव्याची आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करावी या तलावामध्ये पाणी सोडावे, यासंदर्भात माजी सदस्य कांतिलाल तावरे यांनी पाटबंधारे विभागाला लेखी निवेदन दिले आहे.