Madhuri Elephant News : तब्बल ३ महिन्यांनी माधुरी हत्तीणीने वनतारात गेलेल्या माहुत इस्माईल चाचाला बघताच काय केलं, माधुरीबाबत लवकरच गूड न्यूज...
esakal November 03, 2025 10:45 AM

Madhuri Elephant Ismail Chacha : माधुरी हत्तीण आणि माहुत इस्माईल चाचा यांची गुजरात येथील वनतारामध्ये तब्बल ३ महिन्यांनी भेट झाली. या भेटीत माहुत इस्माईल चाचा आणि माधुरीचे डोळे पाणावले. प्रेम, ओळख आणि नात्याचा हा स्पर्श शब्दांच्या पलीकडचा होता. तीन महिन्यांहून अधिक काळानंतर माधुरी हत्तीण आपल्या ‘चाचांना’ भेटली आणि त्यांना पाहताच तीने प्रेमाने सोंड पुढे केली. इस्माईल चाचांनी हाक मारताच माधुरीसह इस्माईल चाचांचे पाणावलेले डोळे पाहून सगळेच थक्क झाले.

कोल्हापूर जिल्ह्यातील माधुरी हत्तीणीच्या प्रकृतीच्या कारणास्तव काही महिन्यांपूर्वी तिला गुजरातमधील ‘वनतारा’ येथे हलवण्यात आले होते. मागील तीन महिन्यांपासून माधुरी तिथे वास्तव्यास आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या हाय पॉवर कमिटीच्या आदेशानुसार माधुरीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, तिचा आरोग्य अहवाल समितीकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या तपासणीदरम्यान कोल्हापूर येथील नांदणी मठाचे पदाधिकारी आणि माधुरीची सेवा करणारे माहुत इस्माईल चाचा हे वनतारामध्ये उपस्थित होते.

“माधुरी”चा भावनिक प्रतिसाद

इस्माईल चाचांनी माधुरीला हाक मारली, “चल माधुरी, माझ्या जवळ ये!” आणि काही क्षणांतच माधुरीने सोंड पुढे करत आपुलकीने प्रतिसाद दिला. इस्माईल चाचांनी तिला नेहमी शिकविलेल्या काही हालचाली करण्यास सांगितले आणि माधुरीने त्या ओळखीच्या आज्ञा तंतोतंत पार पाडल्या. २५ वर्षे जणू पोटच्या लेकरासारखी काळजी घेतलेल्या या दोघांच्या भेटीतला ओलावा उपस्थित प्रत्येकाच्या मनाला भिडला. अशी माहिती नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी दिली.

वैद्यकीय समितीने माधुरीच्या आरोग्य स्थितीचा सविस्तर अहवाल तयार करून सर्वोच्च न्यायालयाच्या हाय पॉवर कमिटीला सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वनतारा येथील अधिकार्यांनी माधुरीला आवश्यक उपचार, आहार आणि विश्रांती मिळावी यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेत असल्याचे सांगितले आहे.

Kolhapur Couple killed : कोल्हापुरातील पती पत्नीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू नाही तर कुख्यात गुंडाने दगडाने ठेचून केला खून, कारण काय?

माधुरीसाठी तिर्थक्षेत्र शिखरजीमध्येही प्रार्थना

२८ ऑक्टोबरपासून पासून नांदणी मठाचे स्वस्तश्री जिनसेन भट्टारक स्वामीजींच्या नेतृत्वात शिखरजी शास्वत सिद्ध क्षेत्रावर सिद्धचक्र विधान चालु आहे. शिखरजी क्षेत्रावर माधुरी हत्तीसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी देशभरातील भाविकांचा एकच प्रश्न माधुरी हत्ती मठात परत कधी येणार. झारखंडातील सर्वात उंच पर्वतावर पारस प्रभुंच्या आशिर्वादाने माधुरीच्या परतीच्या प्रवासात मदत करणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नाला यश येऊ दे आणि माधुरी हत्ती लवकर परत येऊ दे अशी प्रार्थना करण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.