मदरसा योजनेसाठी
प्रस्तावांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय - मुंबई यांच्याकडून झाकीर हुसैन डॉ. आधुनिकीकरण मदरसा योजना २०२५ - २६ मध्ये राबविण्यात येत आहे. राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत कार्यक्षेत्रातील मदरशांनी विहित अटी व शर्तीची पूर्तता करुन २०२५-२६ या वर्षाकरीता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा अल्पसंख्याक कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे १४ नोव्हेंबरपर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी यशवंत बुधावले यांनी केले आहे. प्रस्तावांमध्ये शासन निर्णय २१ ऑगस्ट, २०२४ मध्ये नमूद क जिल्ह्याच्या करण्यात आलेल्या एकूण १२ पायाभूत सोयी सुविधांपैकी आवश्यक सोई-सुविधांकरिता अनुदानाचे प्रस्ताव रु. १० लक्ष्यच्या मर्यादित सादर करावेत. विहित अर्जाचा नमुना याबाबतचा अधिक तपशील शासन निर्णय उपलब्ध आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जाची दखल घेण्यात येणार नाही, असेही त्यांनी कळविले आहे.
...................
कोलगाव कलेश्वरचा
शनिवारी जत्रोत्सव
सावंतवाडी ः कोलगाव येथील ग्रामदैवत श्री कलेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवारी (ता.८) होणार आहे. सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर कलेश्वरच्या दर्शनासह केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे-नवस फेडणे या कार्यक्रमासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी कायम राहणार आहे. रात्री ११ वाजता मंदिराभोवती ढोलताशांच्या व फटाक्यांच्या आतषबाजीसह पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री १ वाजता आरोलकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे -मानकरी हरी राऊळ, श्री देव कलेश्वर देवस्थान कमिटीचे राजन राऊळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
................
तेंडोली रवळनाथचा
बुधवारी जत्रोत्सव
कुडाळ ः तेंडोलीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव ५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून दर्शन व ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे, रात्री ८ वाजता टिपर (पणत्या) लावणे, १० वाजता पालखी सोहळा, ११ वाजता मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक, दुसऱ्या दिवशी सकाळी दहिकाला होऊन सांगता होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन स्थानिक देवस्थान समिती व तेंडोली ग्रामस्थांनी केले आहे.
...............
‘पशुपालन’लाही
वीज दरात सवलत
कणकवली ः पशुपालन व्यवसायास कृषीसम दर्जा देण्यात आल्याने या व्यवसायाअंतर्गत पशुपालन करणाऱ्यांना वीजदरात सवलत देण्यात येणार आहे. यासाठी पशुसंवर्धनविषयक व्यवसायासाठी वीज दर आकारणी करताना कृषी इतर या वर्गवारीनुसार न करता, कृषी वर्गवारीप्रमाणे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात २५ हजार किंवा त्यापेक्षा कमी मांसल कुक्कुटपक्षी, ५० हजार किंवा त्यापेक्षा कमी अंडी उत्पादक कुक्कुटपक्षी, ४५ हजार किवा त्यापेक्षा कमी क्षमतेचे हॅचरी युनिट, १०० किंवा त्यापेक्षा कमी दुधाळ जनावरांचा गोठा, ५०० किंवा त्यापेक्षा कसी मेंढी-शेळी गोठा, २०० किंवा त्यापेक्षा कमी वराह आदीचा समावेश आहे. सवलतीस पात्र लाभार्थ्यांचा तपशील संबंधित तालुका पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय अधिकारी यांनी महावितरण कंपनीला उपलब्ध करून द्यायचा आहे.
...............
वजराट गिरेश्वरचा
गुरुवारी जत्रोत्सव
वेंगुर्ले ः वजराट येथील श्री देव गिरेश्वर या देवतेचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी (ता.६) होणार आहे. त्यानिमित्त सकाळी पूजा व केळी, नारळ अर्पण करणे व रात्री नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य कंपनीचा नाट्यप्रयोग होणार आहे. लाम सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन गाव प्रमुख सूर्यकांत पुंडलिक परब यांनी केले आहे.
.................
शाळा, संस्थांना
प्रस्तावाचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः राज्यातील अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा शासनस्तरावरुन पुरविण्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक शाळांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा अल्पसंख्याक कक्ष यांच्याकडे १४ नोव्हेंबरपर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी यशवंत बुधावले यांनी केले आहे. लाभ घेण्यास अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौद्ध, पारसी, जैन असे ७० टक्के अल्पसंख्याक शिक्षण घेत आहेत, अशा संस्था पात्र आहेत.