नारायणगाव, ता. २ : ‘‘पुणे जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आणायची आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. बुथ कमिट्या, सुकाणू समिती स्थापन करावी. इच्छुकांनी दहा नोव्हेंबरपर्यंत पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल करावेत. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करावे. स्थानिक परिस्थिती पाहून युती, आघाडी होऊ शकते, मात्र जेथे ताकद आहे, तेथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार आह,’’ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व जुन्नर नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी रविवारी (ता. २) दुपारी दिवंगत माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी गारटकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व निवडणुकीसंदर्भात पक्षाची भूमिका जाहीर केली. यावेळी माजी आमदार अतुल बेनके, जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे, नेते गणपत फुलवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, भाऊ देवाडे, बाळासाहेब खिलारी, फिरोज पठाण, विनायक तांबे, पक्ष निरीक्षक उज्ज्वला शेवाळे, तालुका महिला अध्यक्षा सुप्रिया लेंडे आदी उपस्थित होते.
गारटकर म्हणाले, ‘‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपंचायत निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी बुथचे सूक्ष्म नियोजन करावे, मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात करावी, निष्ठावान कार्यकर्त्यांची सुकाणू समिती स्थापन करावी, ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील निवडून येणाऱ्या उमेदवाराचे नाव पक्षाला सुचवावे. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याचे निष्ठेने काम करावे. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, त्यांना योग्य वेळी न्याय दिला जाईल. अहंकार, स्वार्थ बाजूला ठेवा. पक्षासाठी त्याग करा. कार्यकर्त्यांनी पक्ष शिस्त पाळावी. सात नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांची बैठक घेतली जाईल. त्यानंतर उमेदवारी निश्चित केली जाईल.’’
आगामी जिल्हा परिषद- पंचायत समिती व जुन्नर नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. प्रत्येकाला कसा न्याय द्यायचा, हा प्रश्न आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याची पक्षाची क्षमता आहे. निष्ठावानांना बरोबर घेऊन निवडणूक लढवू. इतर पक्षातील इच्छुकांनी पक्ष प्रवेश करून सदस्यत्व स्वीकारावे. निष्ठावानांना उमेदवारी देण्याची माझी भूमिका आहे, मात्र उमेदवारीबाबत अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील.
- अतुल बेनके, माजी आमदार