Turkey Earthquake: तुर्कीमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के; अनेक इमारती जमीनदोस्त, नागरिकांची धावाधाव
Tv9 Marathi November 04, 2025 07:45 AM

तुर्कीमध्ये सोमवारी भूंकपाचे तीव्र झटके जाणवले. यामध्ये अनेक इमारती ढासळल्या. काही इमारती धराशायी झाल्या. ज्या इमारती यापूर्वीच्या भूकंपात क्षतीग्रस्त झाल्या होत्या. त्या आता धोकादायक स्थितीत आहेत. रिक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी नोंदवली गेली. तुर्कीतील नैसर्गिक आपत्ती विभागाच्या माहितीनुसार, या नवीन आपत्तीत जीवितहानी झाल्याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. बालिकेसिर भागातील सिंदिरगी या शहरात भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे आपत्ती आणि आपत्तकालीन व्यवस्थापन संस्थेने सांगितले.

भूंकपाचे झटके राजधानी इस्तंबूल, बुरसा, मनिसा आणि इजमिर या भागांमध्ये जाणवले. प्राथमिक अहवालानुसार, या आपत्तीत कोणाचेही नुकसान झालेले नसल्याचे समजते. तुर्कीतील मोठा भाग हा भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. त्यामुळे या देशात भूकंपाचे वारंवार धक्के जाणवतात. गेल्या दोन वर्षांत येथे भूकंपाने नागरिकांमध्ये दहशत आहे.

ऑगस्टपासून सातत्याने भूकंपाचे झटके

तुर्कीहा भूकंप प्रवण क्षेत्रातील देश आहे. जगातील काही मोजक्या देशात सातत्याने भूकंपाचे झटके जाणवतात. त्यात तुर्कीचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात तुर्कीतील उत्तर आणि पश्चिमी भागातील बालीकेसीर या राज्यातील सिंदरगीमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप आला होता. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. यानंतर सातत्याने भूकंपाचे झटके जाणवत आहेत.

राष्ट्रपती एर्दोगान यांची प्रार्थना

सप्टेंबरमध्ये तुर्कीतील बालिकेसीर या राज्यात 4.9 तीव्रतेचा भूंकप आला होता. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, बालिकेसीर या राज्यातील सिंदिरगीमध्ये भूंकपाचे केंद्रबिंदू हे 7.72 किलोमीटर खोल होते. कालच्या भूकंपामुळे तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप एर्दोगान यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली. देशातील सर्वात मोठे शहर इस्तंबूलसह अनेक भागांमध्ये भूकंपाचे झटके जाणवले आहे. नागरीक भयभीत झाले आहेत.

2023 मध्ये 7.8 तीव्रतेता भूकंप

2023 मध्ये 7.8 तीव्रतेचा भूकंप आला होता. त्यात 53,000 हून अधिक नागरिकांचा जीव गेला होता. 11 दक्षिणी आणि दक्षिण-पूर्व भागातील लाखो इमारती नुकसानग्रस्त झाल्या होत्या. शेजारील सीरियामधील उत्तरी भागात 6,000 हून अधिक नागरीक ठार झाले होते. गेल्या तीनमहिन्यांपासून या भागात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असल्याने नागरीक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. तर अनेक मोडकळीस आलेल्या इमारती या लोकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. त्यामुळे या भागात न फिरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.