बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20i मालिका खेळत आहे. त्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात टेस्ट सीरिज खेळणार आहे. उभयसंघात एकूण 2 कसोटी सामने होणार आहेत. या 2 सामन्यांसाठी बीसीसीआय निवड समितीने 5 नोव्हेंबरला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन भारतीय संघ जाहीर केल्याची माहिती दिली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा कोलकातामध्ये होणार आहे. शुबमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर ऋषभ पंत याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा असणार आहे. पंतचं दुखापतीनंतर भारतीय कमबॅक झालं आहे. पंतला इंग्लंड दौऱ्यात दुखापत झाली होती. त्यामुळे पंतला मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेला मुकावं लागलं होतं.
निवड समितीने मायदेशातील या मालिकेसाठी भारताचा वेगवान गोलंदाज आणि निर्णायक क्षणी बॅटिंग करणाऱ्या आकाश दीप यालाही संधी दिली आहे. आकाशला वेस्ट इंडिज विरूद्धच्या मालिकेसाठी संधी देण्यात आली नव्हती. आकाशने इंग्लंड दौरा गाजवला होता. आकाशदीने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील 3 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेत नेत्रदीपक कामिगरी केली होती.
तसेच निवड समितीने इंग्लंड दौऱ्यात बॉलिंगने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एका गोलंदाजाला वगळलं आहे. निवड समितीने प्रसिध कृष्णा याला वगळलं आहे. प्रसिधने इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांमध्ये 14 विकेट्स मिळवल्या होत्या. मात्र प्रसिधला त्यानंतर मायदेशात झालेल्या विंडीज विरूद्धच्या 2 पैकी एकाही कसोटी सामन्यात संधी दिली गेली नाही.
तसेच ऋषभ पंत याच्या कमबॅकमुळे विकेटकीपर एन जगदीशन याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जगदीशनला इंग्लंड दौऱ्यात पंतला दुखापत झाल्यानंतर संघात संधी देण्यात आली होती. तसेच बांगलादेश विरुद्धही जगदीशन भारतीय संघात होता. मात्र जगदीशनला त्या मालिकेतही पदार्पणाची संधी मिळाली नाही.
पहिला सामना, 14 ते 18 नोव्हेंबर, इडन गार्डन्स, कोलकाता
दुसरा सामना, 22 ते 26 नोव्हेंबर, बारसपारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडीक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि आकाश दीप.