Pm Modi Meet Team India : कमबॅकचं कौतुक, अमनजोतच्या कॅचचा उल्लेख, वर्ल्ड कप विजयानंतर PM मोदींनी खेळाडूंसह काय काय चर्चा केली?
Tv9 Marathi November 06, 2025 01:45 AM

वूमन्स क्रिकेट टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करत भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. वूमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात रविवारी 2 नोव्हेंबर रोजी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत वनडे वर्ल्ड कप जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. भारताला याआधी 2 वेळा अंतिम सामन्यात वर्ल्ड कपने हुलकावणी दिली होती. मात्र भारताने तिसर्‍या प्रयत्नात पहिलावहिला वर्ल्ड कप मिळवला. भारतीय मुलींनी केलेल्या या कामगिरीनंतर त्यांचं सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जात आहे. आता वर्ल्ड कप विजयाच्या 2 दिवसांनंतर महिला संघानी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. मोदींनी महिला संघाचं सर्वप्रथम अभिनंदन केलं. या भेटीत खेळाडू आणि पंतप्रधानांनी वर्ल्ड कप स्पर्धेतील अनेक मुद्दयांवर संवाद साधला. भारताच्या अनेक खेळाडूंनी मोदींसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. मोदींनी प्रत्येक खेळाडूसह चर्चा केली. भारतीय खेळाडूंचं आणि मोदींचं एकमेकांसह काय बोलणं झालं? हे सविस्तर जाणून घेऊयात.

मोदींकडून कमबॅकचा उल्लेख

मोदींनी टीम इंडियाच्या सलग 3 पराभवानंतर केलेल्या कमबॅकचा उल्लेख करत अभिनंदन केलं. भारताने या मोहिमेत पहिले सलग 2 सामने जिंकले. मात्र त्यानंतर भारताला ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडकडून पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे भारतीय संघावर समाजमाध्यमांवरुन टीका करण्यात आली. मात्र खेळाडूंनी आपल्या कामगिरीने दाखवून दिलं.मोदींनी या कमबॅकबाबत खास कौतुक केलं.

हरमनप्रीतने सांगितली आठवण?

कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने मोदींसह बोलताना 2017 च्या भेटीचा उल्लेख केला. भारताला 2017 साली वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध अवघ्या 9 धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर उपविजेत्या संघाने मोंदींची भेट घेतली होती. यावर हरमनप्रीत म्हणाली की, “तेव्हा आम्ही ट्रॉफीशिवाय भेटलो होतो. मात्र आता ट्रॉफीसोबत भेटत आहोत”.

पंतप्रधान मोदींनी आम्हाला कशी प्रेरणा दिली, याबाबत उपकर्णधार स्मृती मंधाना म्हणाली. “पंतप्रधानांनी आम्हाला प्रेरणा दिली होती. ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. मुली आज सर्व क्षेत्रात पंतप्रधानांमुळेच चांगली कामगिरी करत आहेत”, असं स्मृती म्हणाली.

दीप्ती शर्माच्या टॅटूचा उल्लेख

टीम इंडियाची ऑलराउंडर दीप्ती शर्मा हीने ती पंतप्रधानांना भेटण्यासाठी उत्सूक असल्याचं सांगितलं. तसेच दीप्तीनेही हरमनप्रीत प्रमाणेच 2017 च्या भेटीचा उल्लेख केला. “मी पंतप्रधानांना भेटण्याची वाट पाहत होती. पंतप्रधानांनी 2017 साली कठोर मेहनत घेतल्यास स्वप्न पूर्ण होईल, असं त्यांनी सांगितलं होतं”, असं म्हणत दीप्तीने जुन्या आठवणींना उजाळा दिला.

तसेच मोदींनी दीप्ती शर्माच्या “जय श्री राम” या इंस्टा पोस्टचा उल्लेख केला. सोबतच दीप्ती शर्माच्या हातावरील रामभक्त हनुमानाच्या टॅटूबाबतही भाष्य केलं. यावरुन दीप्तीने “मला यामुळे (टॅटू) शक्ती मिळते”, असं सांगितलं.

ऑलराउंडर अमनजोतने घेतलेल्या कॅचचा उल्लेख

टीम इंडियाची ऑलराउंडर अमनजोत कौर हीने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. अमनजोतने फायनलमध्ये निर्णायक क्षणी दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन लॉरा वोल्वार्ड हीचा कॅच घेतला. अमनजोतने तिसऱ्या प्रयत्नात कॅच घेतला. या कॅचमुळे सामन्याला कलाटणी मिळाली. अमनजोतचा हा कॅच गेमचेंजर ठरला.

मोदींनी अमनजोतच्या कॅचचा उल्लेख केला. “कॅच घेताना तुम्ही बॉल पाहिला असेल. मात्र कॅच घेतल्यानंतर तुम्हाला ट्रॉफी दिसली असेल”, असं मोदींनी म्हटलं.

“माझा भाऊ तुमचा चाहता”

टीम इंडियाची बॉलर क्रांती गौड हीने मोदींसह संवाद साधला. क्रांतीने या दरम्यान तिचा भाऊ त्यांचा मोठा चाहता असल्याचं मोदींना सांगितलं. त्यानंतर मोदींनी क्रांतीच्या भावाला भेटीचं आमंत्रण दिलं.

पंतप्रधानांकडून खेळाडूंना आवाहन

तसेच मोदींनी अखेरीस खेळाडूंना आवाहन केलं. पंतप्रधानांनी विशेष करुन मुलींसाठी फिट इंडियाचा मेसेज घेऊन जाण्याचं आवाहन केलं. मोदींनी लठ्ठपणाच्या वाढत्या समस्येवर चर्चा केली. तसेच फिट राहण्याचं किती महत्त्व आहे हे नमूद केलं. तसेच खेळाडूंनी त्यांच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना प्रेरित करावं, असं आवाहन पंतप्रधांनांनी आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 विजेत्या संघाला केलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.