भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदा आयसीसी महिला वर्ल्ड कप 2025 जिंकला आहे. चॅम्पियन बनून इतिहास रचला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात आनंदाच वातावरण आहे. या शानदार विजयानंतर महिला टीम 5 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी त्यांच्या 7 लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी पोहोचली. या दरम्यान खेळाडूंनी पीएम सोबत फोटो काढले. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. एका खास फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना यांच्यामध्ये उभे दिसतायत. पण हैराण करणारी बाब म्हणजे पीएम मोदींनी वर्ल्ड कपच्या ट्रॉफीला स्पर्श केला नाही. यामागे एक खास कारण आहे.
वर्ल्ड कपच्या ट्रॉफीला फक्त चॅम्पियन्सच स्पर्श करतात, अशी मान्यता आहे. ही परंपरा खेळाडूंनी कमावलेल्या यशाच्या सन्मानासाठी आहे. पीएम मोदी यांनी यांचं पंरपरेच पालन करत वर्ल्ड कपच्या ट्रॉफीला स्पर्श करणं टाळलं. याचं सर्व श्रेय महिला टीमला दिलं. वर्ल्ड कपच्याट्रॉफीला स्पर्श करण्याचा अधिकार देशाच्या पंतप्रधानांना आहे. पण पीएम मोदींनी खेळाडूंना सन्मान देण्यासाठी ट्रॉफीला स्पर्श करायचं टाळलं. या भेटी दरम्यान पीएम मोदींनी खेळाडूंकडून त्यांच्या विजयाची गोष्ट ऐकली. त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पीएम मोदींनी पहिल्यांदा असं केलं नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं करण्याची ही पहिली वेळ नाहीय. वर्ष 2024 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकून भारतीय टीम वेस्ट इंडिजहून थेट दिल्लीत उतरली होती. त्यांनी सुद्धा पीएम मोदींची भेट घेतलेली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांच्यासोबत फोटो काढलेला. पण पीएम मोदींनी T20 वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नव्हता. पीएम मोदी यांच्या या निर्णयाचं त्यावेळी सुद्धा भरपूर कौतुक झालेलं.
ऑस्ट्रेलियाचा वनडे वर्ल्ड कपमधील हा पहिला पराभव
आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकणं हे भारतासाठी कुठल्या स्वप्नापेक्षा कमी नाही. आतापर्यंत एकदाही भारतीय महिला टीमला हा किताब जिंकता आलेला नव्हता. दोनवेळा फायनलमध्ये पोहोचून ट्रॉफीने हुलकावणी दिलेली. पण हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमने अनेक वर्षांपासूनची ही प्रतिक्षा संपवली. सेमीफायनलमध्ये भारतीय टीमने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. 2017 नंतर ऑस्ट्रेलियन महिला टीमचा वनडे वर्ल्ड कपमधील हा पहिला पराभव आहे.