ऐतिहासिक विजयानंतर भारतीय महिला संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची वर्ल्ड कप ट्रॉफीसह भेट घेतली. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मु यांनी विश्व विजेत्या संघासह संवाद साधला. तसेच भारतीय संघाचं अभिनंदन केलं. त्यानंतर आता बहुतांश खेळाडू हे आपल्या राज्यात पोहचलेत. या खेळाडूंचा स्थानिक क्रिकेट बोर्ड आणि राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला. वर्ल्ड कप विजेत्या संघात महाराष्ट्रातील 3 खेळाडूंचा समावेश होता. या 3 खेळाडूंचा शुक्रवारी 7 नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना बक्षिसही देण्यात आलं.
भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात महाराष्ट्रातील 3 वाघीणींनी महत्त्वाची भूमिका बजावली. उपकर्णधार स्मृती मंधाना, जेमीमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव या तिघांनी उल्लेखनीय कामगिरी केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय निवासस्थानी या 3 खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांनी तिन्ही खेळाडूंना 2 कोटी 25 लाख रुपयांचं रोख बक्षिस दिलं.
मुख्यमंत्री काय म्हणाले?स्मृती, जेमीमाह आणि राधा या तिघी महाराष्ट्राचा गौरव असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या वेळेस म्हटलं. तसेच भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकून महिला खेळाडूंना प्रत्येक खेळात पुढे जाण्याची आणि जगात आपली छाप सोडण्यासाठी प्रेरणा दिली असल्याचं नमूद केलं.
सपोर्ट स्टाफचं कौतुकटीम इंडियाच्या या विजयात सपोर्ट स्टाफचं योगदान निर्णायक ठरलं. सपोर्ट स्टाफ कायमच प्रसिद्धीपासून दूर असतात. मात्र मुख्यमंत्र्यांनी या सपोर्ट स्टाफचंही अभिनंदन केलं. तसेच उपस्थित कोचिंग आणि सपोर्ट स्टाफमधील खेळाडूंना धनादेश देऊन सन्मानित केलं. फडणवीस यांनी टीम इंडियाचे हेड कोच मुंबईकर अमोल मुझुमदार यांना 22.5 लाख रुपयांचा धनादेश दिला. तसेच सपोर्ट स्टाफमधील प्रत्येकाला 11 लाख रुपये दिले. यावळेस महिला संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक अविष्कार साळवी, दिग्गज आणि माजी भारतीय क्रिकेट डायान एडुल्जी आणि सपोर्ट स्टाफमधील इतर सदस्य उपस्थित होते.
अमोल मुझुमदार काय म्हणाले?अमोल मुझुमदार यांनी यावेळेस मनोगत व्यक्त करताना भारतीय महिला संघातील खेळाडूंच्या मेहनतीचा आवर्जुन उल्लेख केला. “या खेळाडूंनी वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली”, असं मुझुमदार म्हणाले.
राज्य सरकारकडून वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंचा सत्कार
“महाराष्ट्राने कायमच साथ दिलीय”भारतीय महिला क्रिकेट संघाचा विजय पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या खेळाडू उपकर्णधार स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स व राधा यादव आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचा सत्कार करण्यात… pic.twitter.com/dmU1V70Fm3
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra)
“आम्हाला सन्मानित करणं ही आमच्यासाठी खरंच खास बाब आहे. महाराष्ट्राने कायमच आमची साथ दिली आहे. आम्हाला 2017 साली उपविजेता ठरल्यानंतरही राज्य सरकारकडून सन्मानित करण्यात आलं होतं”, असं म्हणत स्मृतीने जुन्या आठवणींना उजाळा दिला. हा विजय कोचिंग आणि सपोर्ट स्टाफशिवाय शक्य नव्हता, असं म्हणत स्मृतीने पडद्यामागच्या सर्वांना श्रेय दिलं.
राधा यादव काय म्हणाली?“माझी अशाप्रकारे सन्मानित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा क्षण माझ्या कारकीर्दीतील अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे”, असं राधा यादव म्हणाली.