ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ ने भारतीय क्रिकेटबद्दल मत प्रदर्शन करताना काही सल्ले दिले आहेत. पुढच्या 2027 च्या वनडे वर्ल्ड कपचा विचार करता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भविष्याबद्दल एक अनिश्चितता आहे. यात भारतीय संघासाठी वर्ल्ड कपचा मार्ग बनवताना चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांची महत्वाची भूमिका राहणार आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ ने या बद्दल चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांना परखड सल्ला दिला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या सध्याच्या घडीला काय भावना असतील, त्यांना काय वाटत असेल हे स्टीव्ह वॉ ला चांगलं कळत असेल. कारण दोन दशकापूर्वी तो सुद्धा याच स्थितीतून गेलाय.
त्यावेळी क्रिकेटऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष ट्रेव्होर जोन्स यांनी स्टीव्ह वॉ ला तो कठोर निर्णय सांगितला होता. आपण एका वेगळ्या दिशेला चाललो आहोत, असं ते वॉ ला म्हणालेले. त्या निर्णयाने स्टीव्ह वॉ ला धक्का बसलेला. त्याला टीममधून वगळण्यात आलेलं. पण या मध्येच ऑस्ट्रेलियन क्रिकेटच हित आहे, हे दोघांना समजलेलं. आज करिअरच्या या टप्प्यावर विराट आणि रोहित त्याच बोटीत आहे. यात संवाद महत्वाचा आहे हे स्टीव्ह वॉ जाणतो. ऑस्ट्रेलियाच्या या ग्रेट खेळाडूने भारताच्या या दोन्ही सुपरस्टार फलंदाजांना स्पष्ट संदेश दिलाय.
काय म्हणाले स्टीव्ह वॉ?
“खेळाडूंनी थोडी जबाबदारी घेतली पाहिजे. व्यक्तीपेक्षा खेळ मोठा आहे, हे समजून घेतलं पाहिजे. तुम्ही खेळापेक्षा स्वत:ला मोठे समजू शकत नाही. खेळ सुरु राहणार. कोणीतरी तुमची जागा घेणार हे तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. तुमची जागा कोणी घेऊ शकत नाही असं, नाहीय. त्यामुळे प्लेयर्स खेळ ठरवू शकत नाहीत. दिवसाच्या शेवटी निवड समितीच्या अध्यक्षाला खेळाच्या भल्यासाठी निर्णय घ्यावा लागेल” असं स्टीव्ह वॉ वरिष्ठ पत्रकार विमल कुमार यांच्याशी बोलताना म्हणाले.
निवड समिती अध्यक्षाची भूमिका
त्यांनी कोहली आणि रोहितच्या भविष्याबद्दल प्रश्न विचारलेला. स्टीव्ह वॉ ने अप्रत्यक्षपणे, भारतीय क्रिकेटला रोहित-विराटच्या पुढे पहावं लागेल. यात निवड समिती अध्यक्षाची भूमिका महत्वाची असेल हे सूचित केलं. रोहित आणि विराटचं वय 38 आणि 37 आहे. मागच्यावर्षी भारताने टी 20 वर्ल्ड कप जिंकला, त्यावेळी त्यांनी टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर टेस्ट क्रिकेटमधून रिटायर झाले. पण वनडेमधून त्यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही.